आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे पाऊल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री महाआरोग्य
अभियान
हेल्थकेअर, नर्सिंग,
पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ
मुंबई,
दि. ८ : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध
३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे
महत्व अधोरेखीत झाले आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी
शासन कटीबद्ध आहे. आज सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल
मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी
महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय
निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री
राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या
प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य
कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच राज्याचे मुख्य सचिव
सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.
प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक
तसेच प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थी उमेदवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित
होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, काळाची गरज ओळखून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे आरोग्य विभागाला
सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य
क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा
चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य
विभागाने आज सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील
बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे
राबविली जाईल, असे ते म्हणाले.
कोरोना विषाणुविरुद्ध युद्धच सुरु आहे
असा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले,
आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी
सैनिकाप्रमाणे कोरोनाविरोधात लढत आहेत. युद्धात एकीकडे शस्त्र आवश्यक असते तसेच
सैनिकांचे संख्याबळही महत्वाचे असते. आज सुरु झालेल्या कार्यक्रमातून आरोग्य
क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी
महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल. त्यासाठी या
प्रशिक्षण कार्यक्रमाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे
त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, योजनेसाठी साधारण ३५ ते ४० कोटी
रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. सध्या २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
योजनेचे महत्व लक्षात घेता उर्वरीत निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. सध्याच्या युगात
ज्या युवकामध्ये कौशल्य आहे तो कधीही उपाशी राहत नाही. त्यामुळे कौशल्य विकास
विभागाच्या या कार्यक्रमाची बेरोजगारी निर्मुलनातही महत्वाची भूमिका ठरेल, असे ते म्हणाले.
कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले
की, आपण ही योजना
जाहीर केल्यानंतर केंद्रानेही अशी योजना सुरु केली. सध्या राज्यात या योजनेतून २०
हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. विभागाने रोजगार
निर्मितीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमातून जून २०२१ मध्ये १५ हजार ३६६
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत कुशल उमेदवारांना
प्रमाणीत करण्यासाठी विभागाने आरपीएलचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातून १ लाख
कुशल उमेदवारांना प्रमाणित केले जाणार आहे. युवकांना फक्त प्रशिक्षण नव्हे तर त्यानंतर
रोजगार देण्यासाठी विभागाने महत्वाची पाऊले उचलली आहेत, असे
ते म्हणाले.
उद्योग मंत्री श्री. देसाई म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील कुशल
मनुष्यबळाची उणीव भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम
महत्वपूर्ण ठरेल. या कार्यक्रमासाठी उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य
करण्यात येईल.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे
म्हणाले की, २०२०
मध्ये कोरोनामुळे बेरोजगारीचा निर्देशांक वाढला होता. पण अशा प्रशिक्षण
कार्यक्रमांमुळे युवकांना रोजगारसंधी उपलब्ध होतील. राज्यातील सर्व जिल्हा,
उपजिल्हा, आयुर्वेदीक रुग्णालये यांच्यामार्फत
संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. उमेदवारांना प्रशिक्षणाबरोबरच विद्यावेतनही मिळणार
आहे. लसीकरणासारख्या विविध मोहीमांना वेळोवेळी चांगले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी
हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी
सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख
म्हणाले की, कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर देशात कुठेही झाला नाही असा प्रशिक्षण उपक्रम आज आपण सुरु करीत
आहोत. तो राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये उत्कृष्टरित्या
राबवतील.
विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी
प्रास्ताविक केले, तर
सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशवाह यांनी आभार मानले.
ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने
प्रशिक्षण
"सर्वांसाठी आरोग्य" धोरणाला चालना
देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात कुशल
मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण
कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय
शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्य
क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आरोग्य
क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य
विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात
आली आहे. राज्यातील ३४८ इतकी वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय
रुग्णालये तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत
करण्यात आले असून यामाध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे
कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण
देण्याचे उद्धिष्ट आहे. यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत
सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध
होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी
कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या
पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
अकोला जिल्ह्यात होईल उत्कृष्ट
मनुष्यबळाची उपलब्धता- जिल्हाधिकारी पापळकर
अकोला,दि.७(जिमाका)- मुख्यमंत्री महाआरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्यावतीने आरोग्य
क्षेत्रातील विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमास राज्याचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते
ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास अकोला येथून जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी
गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.
कुसुमाकर घोरपडे, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. श्याम शिरसाम, डॉ. आंभोरे, डॉ. दिनेश
नैताम आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्याला कोरोना
संकटाच्या काळात ज्या प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत होती त्या आरोग्य
क्षेत्रातील लहान लहान अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण यात दिले जाणार आहे. त्यामुळे लवकरच
प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे प्रशिक्षण हे प्रत्यक्ष रुग्णालयांत, जिल्हा
स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिले जाणार असल्याने ते नक्कीच
प्रभावी ठरेल. त्यातून उत्कृष्ट मनुष्यबळ तयार होईल. प्रशिक्षणार्थ्यांना सेवा क्षेत्रात
काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक करतांना द. ल ठाकरे म्हणाले
की, अकोला जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांच्या सुविधेसाठी
अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात
आली आहे. उमेदवारांनी नोंदविलेल्या पसंती क्रमाच्या आधारे त्यांना आरोग्य
क्षेत्रातील विविध प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येते. उमेदवारांना देण्यात
येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय,
अकोला येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
अकोला हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन करणार असुन जे उमेदवार
आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी
कार्यालय परिसर, दुसरा माळा, अकोला
येथे प्रत्यक्ष किंवा ०७२४-२४३३८४९ या क्रमांकावर दुरध्वनीव्दारे संपर्क करावा,असे
आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
०००००




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा