प्राधान्यक्रम ठरवून करा दुरुस्तीची कामे - जिल्हाधिकारी निमा अरोरा

 





        अकोला,दि.२६ (जिमाका)- अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तथापि आता तातडीने दुरुस्ती करतांना जिथे अत्यंत आवश्यकता आहे; तेथील प्राधान्यक्रम ठरवून ही कामे करा. याबाबत उद्यापर्यंत संबंधित तालुक्यांचे तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे खर्चाच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणांना दिले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीत रस्ते खराब होणे, वीज पुरवठा खंडीत होणे, रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटणे अशा बाबींचा समावेश आहे. ही कामे तात्काळ करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करावयाचा आहे. त्यासाठी जिल्हा यंत्रणांचा आज आढावा घेण्यात आला.

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ. अ. गणोरकर,  महावितरणचे पवनकुमार कछोट,  जि.प. अभियंता राहुल शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री,  मजिप्रचे एन.एम राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा चे ए.ए. खान, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे  तसेच तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

तालुकानिहाय झालेल्या नुकसानीचा आढावा यावेळी  घेण्यात आला. यातील कामे करतांना अत्यंत आवश्यक कामे जी करावयाची आहेत त्यांचा समावेश करावा. जिथे गावांचा संपर्क तुटला आहे तेथील कामे प्राधान्याने घ्यावी. वीज पुरवठाही सुरळीत करावा. जिथे राष्ट्रीय महामार्गा लगत नुकसान असेल तेथे राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधावा व त्यांच्याकडून दुरुस्ती करुन घ्यावी. तातडीने दळणवळण सुरु करता यावे यासाठी आवश्यक ती डागडुजी, दुरुस्ती करावी. त्याचा प्राधान्यक्रम तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी ठरवावा. त्याप्रमाणे अंदाजपत्रक सादर करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी दिले. जी कामे अन्य विभागांच्या निधीतून होतील वा अन्य योजनांमधून होऊ शकतील, त्या कामांचा समावेश या कामांमध्ये करु नये,असेही त्यांनी स्पष्ट केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ