जिल्हास्तरीय पीक विमा समितीची बैठक: जास्त पाऊस झालेल्या मंडळात विमा कंपनी व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी- जिल्हाधिकारी अरोरा यांचे निर्देश

                 अकोला, दि. २८ (जिमाका)- नुकसान झालेले कोणीही विमाधारक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहता कामा नये, तसेच ज्या मंडळात जास्त पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे अशा अधिसूचित क्षेत्रात तालुकास्तरावरील अधिकारी व पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी  संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

    जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा समितीची बैठक झाली. याबैठकीस कृषी विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी  जिल्ह्यात  अतिवृष्टी व  नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या  आजअखेर (Online Offline) १३२५८ पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती एचडीएफसी एर्गो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी माहिती दिली.  यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, नुकसान झालेले कोणीही विमाधारक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहता कामा नये असे पहावे. अतिवृष्टीमुळे ज्या मंडळात जास्त पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. अशा अधिसूचित क्षेत्रात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे (Mid Season Adversity) लागू करायचे अधिसुचनेपुर्वी तालुका स्तरावरील अधिकारी व पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी  संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करावा. तसेच मृग बहरात अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील संत्रा पिकाचे अनुदान देणे बाकी असल्यामुळे ते त्वरित AIC विमा कंपनीने अदा करावे. तसेच  १५ मे २०२० रोजी आंबिया बहार अंतर्गत अकोट तालुक्यात वेगाचे वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फरकाची रक्कम एआयसी विमा कंपनीने त्वरित अदा करावी,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत माहितीः-

·         जिल्ह्यात खरीप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना HDFC ERGO या विमा कंपनीकडून राबविली जात आहे.

·         योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.

·         माहे जूलै महिन्यामध्ये जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासाचे आत विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

·         स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप (Crop Insurance App) / HDFC ERGO विमा कंपनीच्या १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर / बँक / कृषि महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

·         या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून ७२ तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे (Crop Insurance App), विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका/जिल्हा कार्यालयात किंवा कृषी/महसूल विभागास देणे आवश्यक आहे.

·         याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषि अधिकारी, विमा कंपनी जिल्हा व तालुका प्रतिनिधी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, संबंधित बँक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हाधिकारी, अकोला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ