अकोला पंचायत समितीची आमसभा व सरपंच शिबीर; विविध विषयांचा आढावा व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव






        
     

अकोला दि.27(जिमाका)- येथील पंचायत समितीतर्फे आज आमसभा व सरपंच शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर हे होते.  यावेळी पंचायत समिती प्रशासनाने विविध विषयांचा आढावा व माहिती सादर केली तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित या कार्यक्रमास  जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई भोजने, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, पं.स. सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंदराव डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे,  सुशांत बोरडे,  श्रीमती पुष्पा इंगळे, आशिष वाटकर, पंचायत समिती सदस्य श्रीमती सुषमा ठाकरे,  मंगला शिरसाठ, सचिन थोरात, छायाताई वानखडे, तहसिलदार सुनिल पाटील, गटविकास अधिकारी  राहुल शेळके आदी उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. या आमसभेत पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने  विविध योजनांबाबतची माहिती तसेच अंमलबजावणीबाबतची सद्यस्थितीदर्शक माहिती सादर करण्यात आली. यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणी, सन 2021-22  मध्ये पंचायत समिती उपकर योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची स्थिती, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत  ग्रामपंचायतींना प्राप्त अनुदानातून झालेली कामे, घरकर वसुली सद्यस्थिती,  सामान्य, स्वतंत्र व प्रादेशिक पाणीकर वसुली, मोफत शालेय गणवेश योजना,मोफत पाठ्यपुस्तक योजना,  शालेय पोषण आहार योजना, तसेच कोविड लसीकरण,  कोविड काळातील उपाययोजना तसेच पंचायत समिती अंतर्गत सर्व विभाग निहाय राबविण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यात आली. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात  कापशी ग्रामपंचायतीला सन 2020-21 आर आर पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्ह्यात प्रथम तसेच कर वसुलीचे उत्कृष्ट काम याबद्दल गौरविण्यात आले. तर  वृक्ष लागवड व संवर्धनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी म्हातोडी ग्रामपंचायत, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची थकबाकीसह 80 टक्के वसुली केल्याबद्दल गोपालखेड ग्रामपंचायत व वडद बु. या ग्रामपंचायतीने 90 टक्के करवसुली केल्याबद्दल  गौरविण्यात आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी केले. या कार्यक्रमास अकोला तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य आदी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ