गोशाळांना अनुदान; अर्ज मागविले

         अकोला, दि.१०(जिमाका)- गोवंशातील पशुंचे पालन पोषण व्हावे, यासाठी राज्य शासनाने गोशाळांना अनुदान देण्याची योजना राबविली असून या योजनेअंतर्गत पात्र व इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. हे अर्ज दि.६ एप्रिल पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अकोला यांच्या कार्यालयात द्यावयाचे आहेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 राज्य शासनाने दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशु-पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या/ असलेल्या गाय, ळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे तसेचअशा पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणासाठी, वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे तसेच त्या जनावरांच्या गोमूत्र, शेण इ. पासुन विविध उत्पादने, खत गोबरगॅस व इतर उप-पदार्थाच्या निर्मीतीस प्रोत्साहन चालना देणे या करिता अस्तित्वात असलेल्या गोशाळेकडून  अर्ज मागविले आहेत. या योजने अंतर्गत गोशाळेने नवीन शेडचे बांधकाम, चाऱ्याची, पाण्याची व्यवस्था, वैरण उत्पादनासाठी पाण्याच्या उपलब्धेकरिता विहीर/ बोअरवेल, चारा कटाई करण्यासाठी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र, मुरघास प्रकल्प, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, गोमुत्र्, शेण यापासुन उत्पादन निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्र इत्यादी मुलभूत सुविधा निर्माण करणेकरिता २५ लक्ष रुपये इतके अनुदान या योजने अंतर्गत अनुज्ञेय असते. या अनुदानापैकी पहिल्या टप्प्यामध्ये १५ लक्ष रुपये व दुसऱ्या टप्प्यामध्ये १० लक्ष रुपये असे अनुदान वितरीत करण्यात येते.

या योजने अंतर्गत गोशाळेची निवड ही राज्यस्तरीय निवड समितीकडून करण्यात येणार असून या समितीचे अध्यक्ष मंत्री पशुसंवर्धन हे आहेत. या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या गोशाळेने पुढील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. गोशाळेची नोंदणी धर्मादाय आयुक्त नोंदणीकृत असावी, संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा, केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण/ चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा ३० वर्षाच्या भाडे पट्टयावरची किमान पाच एकर जमीन असावी तसेच संस्थेने या योजनेतर्गंत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी १० टक्के एवढे खेळते भाग-भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे नजीकच्या मागील तीन वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेने गोसेवा/गो-पालकाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील.तसेच योजनेचा उद्देश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहीत नमूण्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्रे इ. बाबतची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

इच्छुक पात्र गोशाळांनी विहीत नमुन्यातील अर्ज आपल्या संबधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,यांचेकडे दि.६ एप्रिल पर्यंत सादर करावेत. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा तत्सम व्दारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.अधिक माहितीस्तव अर्जदारांनी आपल्या तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अकोला यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ