महिला बचतगटांद्वारे निर्मित उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारणार-पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

 














             अकोला दि.29(जिमाका)- महिलांच्या उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. स्वयंसहायता बचतगटांमधून महिला अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करतात, अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र मॉल उभारु, ज्यात केवळ महिलांच्या बचतगटांनी उत्पादीत केलेली उत्पादने विक्री केली जातील, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केली.

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास पालकमंत्री कडू हे  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. विलास भाले हे होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत,  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण  डॉ. राजेंद्र गाडे, महिला आर्थिक विकास महामंडळ अकोलाच्या समन्वयक वर्षा खोब्रागडे, अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे,  अधिसभा सदस्य विठ्ठल सरप पाटील, मोरेश्वर वानखडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी तंत्रज्ञान  व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महिला आर्थिक विकास महामंडळ,  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विज्ञान केंद्र यांच्या विविध प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन शेतीपूरक उद्योग करणाऱ्या उद्यमशील महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री म्हणाले की, जीवनात बदल घडत असतात आणि ते महत्त्वाचेही असतात. स्त्री शक्ती ही संसार उभा करणारी शक्ती आहे. शासन हे नेहमीच प्रयत्न करणाऱ्यास सहाय्यकारक असते. महिला या मोठ्या कौशल्याने उत्पादने तयार करतात. त्याच्या गुणवत्तेला तोड नाही. मात्र त्यांच्या विपणनाची पुरेशी व्यवस्था नाही. ही व्यवस्था आपल्यास्तरावर निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात येत्या 11 एप्रिल महात्मा फुले जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व बचतगटांच्या प्रमुखांशी हितगुज करुन धोरण ठरविण्यात येईल. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्यात प्रगतीसाठी व जिवनमान उंचावण्यासाठी  आर्थिक प्रगती होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात नंदाताई शंकरराव पिंपळशेंडे रा. वेडली जि. चंद्रपूर, कल्पना विजय दामोदर्क़ रा,. सुनगाव ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा,  लताताई संतोष देशमुख रामनगर ता. रिसोड, वंदना देविदास धोत्रे, रा. विवरा ता. पातुर जि. अकोला, क्षिप्रा मानकर, अमरावती,  प्रतिभा प्रभाकर चौधरी  रा. नवेगाव जि. गडचिरोली,  छायाताई विलास कुइटे रा. बेलखेड ता. तेल्हारा जि. अकोला,  सिंधुताई निर्मळ रा. भेंडवळ ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा,  इंदिरा कांबळे रा. कोली ता बाभुळगाव जि. यवतमाळ,  विमल गोरे रा. सोनखास जि. वाशिम,  भावना भोजराज भाकडे रा. वर्धा, प्रीती मधुकर ढोबाळे रा. उमरी ता. कारंजा जि. वर्धा. या महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन संजीव सलामे यांनी केले.

तत्पूर्वी महिला बचतगटांनी तसेच आत्मा मार्फत प्रशिक्षित महिलांनी  तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटनही पालकमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

00000  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ