जलजागृती सप्ताह; पाण्याच्या वापराबाबत जनसामान्यात जनजागृती करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन






 अकोला,दि.16(जिमाका)-  पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. वातावरण बदल व अनिश्चित पर्जन्यमानामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक असून पाण्याच्या पुर्नवापराबाबत प्रशासन, सामाजिक व शैक्षणिक संस्थानी शालेय विद्यार्थ्यांसह  जनसामान्यापर्यंत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रम दरम्यान त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी  उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला सिंचन मडळाचे अधिक्षक अभियंता सु.गो.राठी, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, अकोला सिंचन मंडळचे उपअधिक्षक अभियंता शिल्पा आळसी, काटेपुर्णा पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष दिगांबर गावंडे, प्रकल्पस्तरीयपाणी वापर संस्थाचे अध्यक्ष मनोज तायडे, केशवराज पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष मुमताज बॉबी देशमुख आदि उपस्थित होते.

जल जागृती उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने होणे आवश्यक असून यांची सुरुवात शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी. याकरीता शाळा व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याचे महत्व रुजवावे. पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा जास्तीत जास्त पुर्नवापर करावा. याकरीता स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवावे. जलजागृती सप्ताह मर्यादित कालावधीतपुरता न राबविता संपुर्ण वर्षभर ही मोहिम राबवावी.  तसेच आगामी काळातील टंचाई लक्षात घेवून सर्व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी योवळी दिले.  

जलजागृती सप्ताहाची सुरवात दिप प्रज्वलन करुन जिल्ह्यातील काटेपुर्णा, पुर्णा, वान, निर्गुणा, उमा व मोर्णा या नद्यांच्या जलाव्दारे कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थिताना जलप्रतिज्ञेचे वाचन करुन प्रतिज्ञा देण्यात आली.  या सप्ताहमध्ये ग्रामीण भागात जल जागृती व्हावी याकरीता कार्यक्रम राबविण्यात येणार असून शासनाच्या योजनाची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक अकोला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सु.गो. राठी यांनी तर आभार प्रदर्शन सौ आळशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अश्विनी देशमुख यांनी केले.

जिल्ह्यात चित्ररथाव्दारे जलजागृती

पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये पाण्याचे महत्व व वापर याबाबत माहिती व्हावी याकरीता शहरी व ग्रामीण भागाच्या महत्वाच्या ठिकाणी चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.  

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ