मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू


अकोला,दि.28(जिमाका)-सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्विकृती 22 सप्टेंबर 2022  पासून सुरू करण्यात आली आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून  महाडीबीटी पोर्टल या प्रणालीव्दारे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इत्यादी योजना राबविण्यात येतात. या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवरून  प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेअंतर्गत प्रतिवर्षीची अर्ज संख्या लक्षात घेता तसेच या योजनेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढणे आवश्यक आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक 08 ऑक्टोबरपर्यंत तर नूतनीकरण अर्जासाठी मुदत 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक 20 ऑक्टोबर तर  नूतनीकरण अर्जासाठी मुदत 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत  संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तसेच  वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक 07 नोव्हेंबरपर्यंत तर नूतनीकरण अर्जासाठी मुदत 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे.

महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर करुन समाजकल्याण कार्यालयात सादर करावे. तसेच महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राव्दारे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी मदत करावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल याकरीता सर्व महाविद्यायांनी प्रयत्न करावे, असेही आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ