अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३: मतदार नोंदणी संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा

 





अकोला, दि.३०(जिमाका)-  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रम शनिवार दि.१ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यासंदर्भात सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आली.

या कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, अभयसिंह मोहिते पाटील, डॉ. रामेश्वर पुरी तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

माहिती देण्यात आल्यानुसार मतदार नोंदणी कार्यक्रम या प्रमाणे- जाहीर सूचना प्रसिद्धी शनिवार   दि. १ ऑक्टोबरला होईल. प्रथम पुन:प्रसिद्धी शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी, तर व्दितीय पुन:प्रसिद्धी मंगळवार, दि. २५ ऑक्टोबरला करण्यात येईल. दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि.७ नोव्हेंबर. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार, दि. १९ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी बुधवार, दि. २३नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा बुधवार, दि. २३ नोव्हेंबर  ते शुक्रवार दि. ९ डिसेंबर पर्यंत राहील. दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे याची अंतिम मुदत रविवार, दि. २५ डिसेंबर आहे. तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी शुक्रवार, दि. ३० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

यावेळच्या मतदार नोंदणी अर्जात प्रथमच मतदारांना आपला आधार क्रमांक देता येणार आहे.  नोंदणीसाठी अर्हता दिनांकाच्या(दि.१ नोव्हेंबर २०२२) तीन वर्षापूर्वी पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.  मतदार नोंदणीसाठीचा अर्ज नमुना १८ मध्येच करावा. हा अर्ज निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यासंदर्भात सहायक मतदार नोंदणी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना त्यांचेवर सोपविलेल्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ