सेवा पंधरवाडा कालावधीत गोल्डन ई-कार्ड व ई-श्रम कार्ड नोंदणीकरीता शिबीराचे आयोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश





      अकोला,दि.29(जिमाका)-  आयुष्मान भारत योजनेतंर्गत गोल्डन ई-कार्ड तसेच असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम कार्ड सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा पंधरवाडा कालावधीत नोंदणी पूर्ण करुन घ्यावी. याकरीता आपल्या स्तरावर शिबीरांचे आयोजन करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल याकरीता शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबधिताना दिले.

            जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयुष्मान भारत व ई-श्रम योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड नोंदणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले, दुरदृष्य प्रणालीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गरजू व गरिब व्यक्तीना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच ई-श्रम पोर्टलवर नोंदणीव्दारे असंघटीत कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा व शासनाचे विविध योजनेचा लाभ दिल्या जातो. याकरीता पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या सीएससी/आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन गोल्डन ई-कार्ड तसेच असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

            जिल्ह्यात सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून गोल्डेन ई-कार्ड मोफत तयार करून देण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकूण 7 लक्ष 74 हजार 783 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लक्ष 66 हजार 222 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार करुन वितरण करण्यात आले आहे.  आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी कुटुंबाना प्रति वर्ष प्रति कुटुंब पाच लक्ष पर्यंत विमा संरक्षण देण्यात येतो. या योजनेतंर्गत 1209 उपचार व 183 पाठपुरावा सेवांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून यात केसरी, पिवळे, अंत्योदय व अन्नपूर्णा योजना कार्ड धारक पात्र लाभार्थ्यांना प्रती कुटुंब प्रती वर्ष 1 लक्ष 50 हजार रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत, 996 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.   

            असंघटित कामगारांचे सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ई- श्रम पोर्टलवर  3 लक्ष 8 हजार 528 कामगारांचे नोंदणी करण्यात असून एकूण 5 लक्ष 27  हजार 391 असंघटीत कामगारांचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. असंघटीत कामगार क्षेत्रातील बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, भाजी व फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा व शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला जातो.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ