स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा उपक्रम: ‘लम्पि’ उपचारांबाबत तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन

 



अकोला, दि.१९(जिमाका)-  राज्यात सध्या गोवंशात फैलावत असलेल्या ‘लम्पि’ या रोगाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर पशुवैद्यकांना लम्पि या रोग व उपचाराबद्दल असलेल्या शंका व भेडसावणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने शनिवारी (दि.१७) आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी माफसूचे विस्तार शिक्षण संचालक प्रा.डॉ. अनिल भिकाने यांनी राज्यभरातील २१६ पशुवैद्यकांना मार्गदर्शन करुन त्यांचे शंकानिरसन केले.

याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय  दिघे, प्रादेशिक सह आयुक्त अमरावती डॉ. मोहन गोहोत्रे,सहआयुक्त पुणे डॉ.गौरीशंकर हुलसुरे,उपआयुक्त अकोला डॉ. जगदीश बुकतरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी तसेच पशुसंवर्धन विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, येवतमाळ, नागपूर, जळगाव, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील उपआयुक्त,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी सहभागी झाले होते.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. भिकाने म्हणाले की, रोगाची तीव्रता अधिक असून  गुंतागुंतीची व  धोकादायक लक्षणे दिसून येत आहेत. सर्वसामान्य लक्षणाबरोबर सतत ताप असणे, छातीवर पोळीवर व पायावर सूज येवून जनावरे लंगडणे,बसावयास त्रास होणे आणि फुफ्फुसदाह आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.त्याच बरोबर शरीरात श्वासनलिका फुफुसे यकृत यात गाठी येत आहेत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे मृत्युदर २ टक्के पेक्षा कमी आहे. बऱ्याचवेळा लम्पि त्वचा रोगाबरोबर  थायलोरिओसिस, बॅबेसिओसिस, अनाप्लाझमोसिस, न्यूमोनिया, कावीळ, गर्भाशयदाह इ. रोगामुळे (Co-Morbidity) जनावरे दगावत आहेत. अशा रोगबाधित पशूंचे रक्त, रक्तजल नमुने, प्रयोग शाळेत पाठवून तपासणी करून पुढील उपचार करावे,असे आवाहन  डॉ भिकाने यांनी केले.

त्यांनी सांगितले की,कीटकवर्गीय माशा, गोचीड, मच्छर यांच्या माध्यमातून विषाणूंचे वहन होत असल्याने पशुपालकांनी योग्यरीतीने जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवणे, गोचिड गोमाशांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात ४ महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या निरोगी जनावरात (गाय वर्ग) प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणून शेळ्यातील देवीची लस उपयुक्त आहे.  माणसात हा आजार होत नसल्याने नागरिकांनी घाबरून जावू नये. शास्त्रीयदृष्ट्या दूध उकळून घेणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे,असे त्यांनी सांगितले. या ऑनलाईन व्याख्यानाचा महाराष्ट्रभरातून २१६ हुन अधिक पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लाभ घेतला. ऑनलाईन व्याख्यानाच्या आयोजनासाठी समन्वयक प्रा. डॉ. एस. पी. वाघमारे, पशुरुग्णालय अधीक्षक तसेच सहसमन्वयक म्हणून डॉ. किशोर पजई व डॉ. भुपेश कामडी यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ