प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक नियमाचे पालन करुन उत्सव साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन







अकोला,दि. 21(जिमाका)- नवदुर्गात्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन व इद ए मिलाद उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सव कालावधीत नियमाचे पालन करुन उत्सव साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शांतता समिती, विविध मंडळ व जिल्हा प्रशासन संयुक्त बैठकीत केले.

सार्वजनिक दुर्गात्सव मंडळ, शांतता समिती व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त बैठकीत आगामी सण उत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीया पोलीस अधिकारी श्री. दुधगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, महावितरण उप कार्यकारी अभियंता एम.एन. अनसिंगकर, अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच शांतता समिती व  मंडळांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक दुर्गात्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेने मंडळांना द्यावयाच्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवावे. पोलीस विभागाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यवाही करावी. उत्सव काळात ध्वनिप्रदुषण  होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे. रात्री १० वा. नंतर ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. तथापि, या कालावधीत नवरात्री उत्सवाचे अष्टमी (सोमवार दि. 3 ऑक्टोंबर) व नवमी(मंगळचसा दि.4 ऑक्टोंबर) या दोन दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी दिली. यावेळी शांतता समिती सदस्य व विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही काही सुचना केल्या.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहे. सार्वजनिक मंडळांनी आपल्यास्तरावर स्वयंसेवकांची सुरक्षा व्यवस्था ठेवावी. विशेषता रात्रीच्यावेळी मुर्तीजवळ सुरक्षा व्यवस्था राहिल याची दक्षता घ्यावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. पोलीसांतर्फे दामिनी पथक हे सज्ज असेल. तसेच नियमित बंदोबस्त असेलच. गर्दीच्या मार्गावर लायटिंग व बॅनरमुळे अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. उत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही याकरीता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी तर सूत्रसंचलन उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ