‘माझे कुटूंब, माझे जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यासाठी शासनाचे दिशानिर्देश


अकोला,दि.7(जिमाका)- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करणे सर्वांनाच आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात नवीन बदलांचा  अवलंब करणे गरजेचे आहे. अशा बदलांचा स्वीकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम दि.15 सप्टेंबर पासून राबविण्यात असून या सर्व बाबी आता जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून साथ रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले

            सर्व नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे हे त्याचे मुख्य उदिष्ट आहे. या मोहिमेत आरोग्य स्वयंसेवकानी घरोघरी जाऊन लोकांची प्राणवायू व ताप तपासणी करणे, नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड -१९ चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे, या बाबी राबविल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही या मोहिमेत समावेश

असणार आहे. मोहिमेच्या एकूण कालावधी दरम्यान साधारणपणे दोन वेळा आरोग्य स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्य पाळताना अनवधानाने चूक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत, हा यातील महत्वाचा भाग आहे. याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सदर मोहिमेदरम्यान नागरिकांना कोविड नियंत्रणासाठी, कोरोनासोबत जगायला शिकणे आजची गरज आहे. यासाठी अत्यंत आवश्यक त्रिसूत्री पुढीलप्रमाणे आहे :

१) नागरिकांनी आपापसात किमान २ मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे.

२) मुखपट्टी/ मुखावरण अर्थात फेस मास्क चा कटाक्षाने नियमितपणे व योग्य वापर करणे.

३) वारंवार हात स्च्छ धुणे. तसेच निर्जुतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) चा योग्यरित्या वापर करणे. या अत्यंत महत्वाच्या त्रिसुत्री प्रत्येकाने पाळल्याच पाहिजेत.

याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात अंमलात आणायलाच हवेत, असे महत्वाचे दिशानिर्देश पुढीलप्रमाणे आहेत.

वैयक्तिक स्तरावर

रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावे. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे, मास्कचा सदैव उपयोग करावा. मास्क् काढून ठेवू नये. नाकाखाली व चेहऱ्याखाली मास्क न ठेवता  योग्य ठेवावा. याबाबत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविषयी काळजी घ्यावी, चेहऱ्याला तसेच मास्कला वारंवार हात लावू नये, एकदाच वापरात येणारे मास्क (सिंगल युज मास्क ) वापरून झाल्यानंतर ते टाकून देण्यापूर्वी त्यावर निर्जुतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्यांचे तुकडे करून नंतर टाकावेत. जेणेकरून त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी गैरउपयोग केला जाणार नाही, सॅनिटाझरची लहान बाटली सातत्याने सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा. हातांची नियमितपणे स्वच्छता राखावी, स्वच्छ हातरुमाल बाळगावा. सर्दी, खोकला असल्यास स्वच्छ मास्क, रुमाल यांचा सातत्याने उपयोग करावा, पुर्नवापराचे मास्क निर्जुतुकीकरण द्राव्याचा उपयोग करून दररोज स्वच्छ धुवावेत, कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो वेगवेगळया स्वरूपाचे/मास्क वापरावे किंवा स्वत:च्या मास्कला वेगळी खुण करावी. जेणेकरून प्रत्येकाचा मास्क ओळखला जाईल. एकमेकांचे मास्क वापरु नये.

 कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेहऱ्याकडे थेटपणे न बघणे, जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनूसार एकादाच ताटात घ्यावेत, जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे. पुरेसा व योग्य वेळ आहार, पुरेशी झोप, व्यायाम,योग,प्राणायाम आदीद्वारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावेकोणेतेही वाहन चालवताना, वाहनांतून प्रवास करतानाही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कारण वाहन थांबवून वाहतुक पोलीस किंवा इतरांशी बोलताना नकळत मास्क नसल्यास संसर्गाचा धोका पोहोचतो, बंदिस्त वातावरण टाळावे. याचप्रमाणे गर्दीत जाणे किंवा निकटचा संपर्कही टाळावा, अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नये. सार्वजनिक ठिकाणी वावरताना थुंकु नये, दरवेळी बाहेरून व कार्यालयातून घरी परतल्यावर सर्वप्रथम आंघोळ करावी व कपडे धुण्यासाठी थेट एका बादलीमध्ये टाकावेत. कोविड विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असणा-या परिसरांना, शहरांना, राज्यांना, देशांना भेट देणे टाळावे.  जर कोविड-19 ची लक्षणे असतील तर आपण कुठे कुठे गेलो होतो आणि कोणा-कोणाला भेटलो ते आठवावे शक्यतोवर भेटीच्या नोंदी ठेवाव्यात.

कौटुंबिक स्तरावर

 कुटुंबात वावरताना, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे, सुचनांचे अनावधाने कोणाकडून उल्लंघन होत असल्यास ते एकमेकांच्या लक्षात आणून दयावे, प्राणवायू पातळी मोजण्यासाठी आवश्यक असलेले उपकरण (ऑक्सिमीटर ) सदैव बाळगावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्राणवायु पातळी ठरावीक कालावधीने तपासून त्यांच्या अचूक नोंदी ठेवाव्यात. शारीरिक तापमापक (थर्मामीटर) व थर्मल स्क्रीनिंग गन घरात बाळगावे, घरातील लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीमानाकडे विशेष लक्ष पुरवावे, घरातील ज्या सदस्यांना सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असतील ते नियमितपणे औषधापचार घेतात, त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहील, याची काळजी घ्यावी.

 कुटुंबात एकत्र सोबतीने जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसावे, शक्यतो घरातील एकाच सदस्याने कौटुंबिक कामांसाठी बाहेर ये-जा करावी व त्या सदस्याने अशी ये जा करताना सुंपूर्ण दक्षता घ्यावी. घरातील प्रत्येक सदस्याने दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत, न धुता कपड्यांचा पून्हा वापर करु नये, भ्रमणध्वनी सारख्या वैयक्तीक वापराच्या वस्तु कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांकडे घेवून/अदलाबदली करून वापरू नयेत. अशा वस्तुदेखील योग्यरित्या स्वच्छ राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे आदी स्वच्छ धुवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात समावेश करावा, ऑनलाईन किवा बाहेरून पार्सल मागवले असल्यास व नाशवंत पदार्थ नसतील तर किमान एक दिवस ते पार्सल तसेच ठेवून दयावे, त्यावर निर्जुतुकीकरण द्रव्य फवारावे व दुसऱ्या दिवशी उघडावे. घरातील फरशी, स्वयंपकागृह, प्रसाधनगृहे, इतर वापराच्या वस्तू यांची नियमितपणे योग्य निर्जुतुकीकरण द्रव्याचा उपयोग करून स्वच्छता करावी. भारतीय बनावटीचे शौचालय असल्यास ते व्यवस्थित स्वच्छ राखावे. पाश्चात्य बनावटीच्या शौचालयातील भांड्यावरील झाकण फ्लश करताना बंद ठेवावे. नातेवाईक-मित्र इत्यांदीकडे जाणे टाळावे, शक्यतो कौटुंबिक समारंभ पार्टी यांचे आयोजन करू नये, निमंत्रित करणे अपरिहार्य असल्यास सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेतच निमंत्रण द्यावे आणि अशा ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

गाव व वसाहतींमध्ये घ्यावयाची काळजी

गावामध्ये व वसाहतींमध्ये वावरताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक असावे. घराबाहेर पडताना प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्क व हातमोज्यांचा योग्यरित्या वापर करून बाहेर पडावे. घरामधील लहान मुले, जेष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत याकडे लक्ष दयावे. घरामध्ये किवा वसाहतींमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुट अंतर राखूनच संवाद साधावा, गावातील मंदिर, सार्वजनिक सभागृह, चावडी याठिकाणी लोकांनी एकत्र येणे टाळावे. घरामधील दरवाजाच्या कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड रेलिंग), बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे. गावातून किवा वसाहतीतून पुन्हा घरात येताच कुठेही स्पर्श न करता सर्वात आधी सॅनिटायझरने किवा साबणाने हात स्वच्छ धुवावेत, बाहेरून येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शारिरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वच्छ धुण्याची सोय आदी बाबी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी, घरातून बाहेर पडताना वाहनांना स्पर्श करण्यापूर्वी त्यांचे निर्जुतुकीकरण करावेनजीकचे सार्वजनिक आरोग्य केंद्र रुग्णालय, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष (वार्ड वॉर रुम ) आदी महत्वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने परिसरात प्रदर्शीत करा.

दुकाने,मंडया व मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना घ्यावयाची काळजी

बाजारपेठेत खरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जाणे, तसेच कमी गर्दीच्या वेळी जाणे, दुकानांबाहेर तसेच आतमध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल याची काळजी घ्यावी. गर्दी असल्यास तिथे प्रवेश करू नये. लिफ्ट ऐवजी शक्यतो जिन्यांचा वापर करावा. कठडयांना स्पर्श करू नये, खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तुंना स्पर्श करणे टाळावे.  खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पध्दतींचा वापर करणे, खरेदी करून आणलेल्या वस्तु काही काळ घराबाहेर किवा मोकळया जागेत किवा जिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात. दुकानदार व व्यावसायिक यांनी मास्क न लावलेल्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये. दुकाने, मंडया, संकुले येथे सुरक्षित अंतराच्या खुणा करून मर्यादित ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश दयावा, दुकानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी शारिरीक तापमान, सॅनिटाझर यांची व्यवस्था करावी, दुकाने,मंडया,संकुले येथे मर्यादित संख्येनेच नोकर व मदतनीस यांची नियुक्ती करावी. व्यवहारांसाठी शक्यतो ऑनलाईन किवा डिजीटल पध्दतींचा अवलंब करावा, कमीत कमी चलन हाताळावे लागेल याची काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येतो.

कार्यस्थळी व कार्यालयांमध्ये घ्यावयाची खबरदारी

कार्यालय प्रमुखांनी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहील याप्रमाणे कामकाजाची  रचना करावी. शक्यतो आळीपाळीने व गरजेनूसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे. कामकाजाच्या वेळा विभागून द्याव्यात. कार्यालयामध्ये शारिरिक तापमान, प्राणवायू पातळी आदींची तपासणी, निर्जुतुकीकरण द्रव्य याची संयत्रे सर्वांसाठी उपलबध असावीत. बैठकांसाठी दूर-दृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) पध्दत उपयोगात आणावी. कामकाजामध्ये शक्य तितका मानवी संपर्क कमी करून डिजीटल पध्दतींचा उपयोग करावा. कार्यालयाची हवा कायम खेळती राहण्यासाठी खिडक्या उघडया ठेवणे. वातानुकूलन यंत्रणेचा वापर न करणे. आत्यंतिक गरज नसल्यास, कार्यालयीन काजकाजविषयक दौरे टाळावेत. कर्मचाऱ्यांनी देखील शक्यतो घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे. (वर्क फ्रॉम होम) शक्य असेल त्यांनी कामावर जाताना दुचाकीने जाणे किंवा पायी चालत जाणे, कमी गर्दीच्या वेळी प्रवास करावा. कार्यालयीन मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतरावर बैठक् व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात स्वचछ धुणे या बाबींकडे आवर्जुन लक्ष दयावे. कार्यालयात बैठकीत सहभागी असल्यास, त्यादरम्यान फेस मास्क चा वापर करणे सूरक्षित अंतरावर बसावे. येणा-या अभ्यांगतांशी संवाद साधताना सुरक्षित अंतर राखून संवाद साधावा.आपल्यासमवेत इतर सहका-यांनीही शारिरिक तापमान, प्राणवायू पातळी इत्यादी माजली आहे. किंवा नाही, याची त्यांना आठवण करून दयावी. कार्यालयात शक्यतो एकत्रित जेवायला बसू नये. कार्यालयांमध्ये लिप्टचा कमीतकमी उपयोग करावा. लिप्टमध्ये मोजक्याच व्यक्तींनी व एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे राहून उपयोग करावा, लिप्टच्या बटनांचा उपयोग करताना कागदी तुकड्यांचा उपयोग करावा.

खाजगी व सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची दक्षता

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने प्रवास करत असताना मौन राखावे, सहप्रवाशांशी बोलू नये, मास्कसमवेत फेसशिल्डचाही उपयोग केल्यास उत्तम, सार्वजनिक वाहनात एका आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे, वाहनांमध्ये गर्दी करून दाटीवाटीने प्रवास करू नये, असा प्रवास टाळणे उत्तम वाहनांनमध्ये दरवाजा, कठडा यांना शक्यतो स्पर्श करु नये. स्पर्श करावा लागणार असल्यास त्या आधी व वाहनांतून उतरल्यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे. शक्यतो खाजगी दुचाकी, चारचाकी वाहनाचा उपयोग प्रवासाच्या गरजेनुसार करावा. खाजगी वाहनांमध्ये विनाकारण सहप्रवासी नेवू नयेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना