दक्षता जनजागृती सप्ताह नितीमुल्यांच्या संवर्धनातून जोपासू पारदर्शकता- जिल्हाधिकारी पापळकर

 




अकोला,दि. 27(जिमाका)-  व्यक्तिगत आचरणात उच्च नितीमुल्यांचे संवर्धन करुन आपण आपल्या दैनंदिन कामकाजात सेवाभाव व पारदर्शकता जोपासून भ्रष्टाचारमुक्त समाज घडवू या, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (दि.31 ऑक्टोबर) लाच-लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह दि. 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान राबविण्यात येतो. त्यानिमित्ताने आज नियोजन भवनात भष्ट्राचार निर्मुलनाची शपथ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत, लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस उपअधिक्षक शरद मेमाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, पोलीस निरिक्षक श्वर चव्हाण, पोलीस नाईक संतोष दहीहांडे तसेच लाचलुचपत विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  ऑनलाईन कारभार डिजीटल तंत्राच्या वापरामुळे शासकीय कामात पारदर्शकता व गतिमानता आली आहे. त्याचा परिणाम म्हणून  शासकीय कार्यालयात गर्दीही कमी झाली आहे. तथापि, काही कामांसाठी नागरिकांची अडवणूक करण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये दिसून येते. या प्रवृत्तीच्या नाशासाठी उच्च नितीमुल्यांचा अंगिकार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात  होणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय विभागात भ्रष्टाचार किवा कोणताही अपहार होत असल्यास लाचलुचपत विभागास किवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच शासकीय काम करताना जनतेला कोणताही प्रकारचा त्रास होवू नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचेही वाचन करण्यात आले.

लाच-लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जन-जागृती निमित्त नियोजन भवनाच्या परिसरात जिल्हाधिकारी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आले. या चित्ररथाव्दारे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार असून याव्दारे नागरिकामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जागृती केली जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ