जनावरांमध्ये लम्पि चर्मरोगाचा प्रादुर्भाव : जनावरांच्या वाहतुकीस मनाईःजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 अकोला,दि.९(जिमाका)-  राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या विषाणू संसर्गातून जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात निरोगी जनावर आल्यास त्यातून होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील पशु (गाई व म्हशी) पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून जनावरांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भात कोणत्या उपाययोजना राबवाव्या याबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन  जनावरांच्या वाहतुकीस मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच मनपा आयुक्त, सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी , गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

लम्पि चर्मरोग संसर्ग म्हणजे काय?

जनावरांना होणारा आजार हा विषाणूजन्य संसर्गजन्य आहे.  लंपी चर्मरोग हा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार असून देशी वंशाच्या जनावरा पेक्षा संकरित जनावरांना हा आजार जास्त होण्याची शक्यता असते . या आजाराचा प्रसार बांधीत जनावराच्या विविध स्त्रावामधून इतर जनावरांना होतो, तसेच त्वचेवरिल खपल्यामधे हा विषाणू अंदाजे १८ ते ३१ दिवस जिवंत राहतो. या रोगाचा प्रसार डास , माशा, गोचीड इत्यादीच्या चावण्यामुळे जनावरांना होतो व आजारी जनावरा पासून निरोगी जनावरांना त्याचा संसर्ग होतो. या आजारामध्ये जनावरांना ताप येतो तसेच त्वचेच्या खाली २ ते ५ सेंमीच्या गाठी येतात.

जनावरांची ने - आण करण्यास मनाई

या आजाराचा जनावरांमध्ये फैलाव होऊ नये व संसर्ग रोखता यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने काही बाबींना मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार गुरे व म्हशी  यांची ने-आण करणे,  कोणत्याही व्यक्तिस, बाधीत जिवंत अथवा मृत प्राणी, बाधीत प्राण्यांच्या संपर्कात आलेली वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन बाधीत क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणतेही अन्य काम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उक्त बाधीत झालेल्या गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टींनाही मनाई करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर

लंपी चर्म रोग संसर्गजन्य असल्याने हा रोग येऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरिता आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर खालील प्रमाणे कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजना

 बाधित परिसरात स्वच्छता करावी तसेच एक टक्का फॉर्मलीन किंवा दोन ते तीन टक्के सोडियम हायपोक्लोराइट, फिनॉल २ टक्के याचा वापर करून परिसर निर्जंतूक करावा. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात मृतदेहाच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकून विल्हेवाट लावावी, बाधित क्षेत्रात व इतर सर्व ठिकाणी या आजाराबाबत पशुपालकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देण्यात यावी, रोगाचा प्रसार बाह्य किटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात यासाठीच्या औषधांची योग्य त्या प्रमाणात फवारणी करण्याबाबत महानगरपालिका , नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी.  पशुपालकांनी गोठा स्वच्छ ठेवण्याबाबत तसेच गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, बाधीत गावांमध्ये तसेच बाधीत गावांपासून पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना एक मिली प्रति जनावर याप्रमाणे ‘गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन’ लस रोगग्रस्त जनावरे वगळता इतरांना सबक्युटॅनियस मार्गाने टोचण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.

उपचाराने आजार बरा होतो

अकोला जिल्ह्यात  दोन लाख ८३ हजार गाय व म्हैसवर्गातील जनावरे आहेत, सद्यस्थितीत त्यापैकी ३ हजार ३७२ जनावरांना हा संसर्ग झाला आहे, अशी माहिती  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ. तुषार बावने यांनी दिली. हा आजार उपचाराने बरा होतो. त्यासाठी संसर्ग झाल्याचे लक्षात येताच आपल्या जनावराला अन्य जनावरांपासून वेगळे करुन  त्याला तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात न्यावे, असेही डॉ बावने यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ