लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 


अकोला, दि.१२ (जिमाका)- राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रभावी नियंत्रणासाठी व अंमलबजावणीकरीता जिल्हास्तरावर राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या (NADCP) अंतर्गत जिल्ह्यामध्ये लाळ- खुरकत रोग (FMD) प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

जनावरांचे टॅगिंग करणे आवश्यक

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्यामधील सर्व पशुधनास(गोवर्ग व म्हैसवर्ग) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी टॅगिंग करुन (कानात टॅग लावणे) टॅगच्या विशिष्ठ ओळख क्रमांकासह लसीकरण केल्याची सविस्तर नोंद इनाफ (INAPH-Information Network For Animal Productivity And Health) या संगणक प्रणालीवर घेणे अनिवार्य आहे. कोणत्याही पशुधनास टॅगिंग केल्याशिवाय लसीकरण करता येणार नाही. लसीकरण मोहीमेअंतर्गत लहान वासरे (चार-पाच महिने वयोगटातील) यांना प्रथम लसीकरण केल्यानंतर २८ दिवसांनी बुस्टर लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण बंधनकारक

केंद्र शासनाचे राजपत्रातील अधिसुचना, प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ दिनांक २० मार्च २०२० व अधिनियमामधील सेक्शन २(डि) नुसार अनुसूचित यादीतील संक्रमन व संसर्गजन्य रोगांचे (लाळ-खुरकत रोग FMD) रोगप्रतिबंधक लसीकरण करणे बंधनकारक असून सेक्शन ६(४) नुसार सर्व पशुपालकांनी त्यांचेकडील पशुधनास लसीकरण करून घेणे सक्तीचे व बंधनकारक राहील. तसेच अभिनियमामधील सेक्शन ८ (१) (२) नुसार लसीकरण करणाऱ्या सक्षम व्यक्तीने लसीकरणापूर्वी जनावरांना चिन्हांकन, गोंदण किंवा कानात टॅग लावणे (संबंधित विभागाचे निर्देशानुसार) बंधनकारक आहे. तसेच अधिनियमामधील सेक्शन ३२ नुसार लसीकरण कामकाजासाठी प्राधिकृत अधिकारी  व कर्मचारी यांना त्यांचे प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना अडथळा आणणे अथवा अभिनियमातील बाबीचे उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीस एक हजार रुपये पर्यंतची दंडात्मक कार्यवाही  किवा दंड न भरल्यास एक महिण्यापर्यंत कारावास शिक्षेची तरतुद केली आहे.

प्रत्येक गावात लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन व प्रसिद्धी देणे, लसीकरण कार्यक्रमासाठी स्थानिक लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग नोंदवणे, शेतकरी बचत गट, महिला बचत गट इतर कार्यरत क्रियाशील सामाजिक गट यांचे सहकार्याने लसीकरण मोहीमेची प्रसिद्धी व शेतकरी - पशुपालकांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद मिळवून गावांमध्ये एकाच सोयीचे ठिकाणी सर्व जनावरांचे लसीकरण होणेबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य करणे, गावांमध्ये पूर्वनियोजित लसीकरण तारखेच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांना योग्य ती सूचना वजा दवंडी  देणेबाबतची कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडी बाजारात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या पशुपालकांचे टॅगीग व लाळ-खूरकत रोगाचे लसीकरण करणे बंधनकारक असल्याबाबत संबंधित सहकार विभागामार्फत अधिनस्थांना व बाजार समिती कळविण्याची योग्य ती कार्यवाही करावी.

तालुकास्तरावर तहसिलदार हे अध्यक्ष

तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे तालुका सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी वेळोवेळी लसीकरण मोहीम अंमलबजावणीबाबत आढावा घेवून येणाऱ्या सर्व अडचणीबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन प्रसंगी आवश्यक ते आदेश संबधित यंत्रणांना निर्गमित करतील.

 केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) हा शेतकऱ्याच्या पशुधनाचे आरोग्य हित व ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना देवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी व पशु पालकांनी त्यांचे पशुधनास टॅगिंग करुन लसीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा संनियत्रण समिती राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ