रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात पहिल्या दिवशी पातूर येथे चाचणी, २२१ पैकी ११ पॉझिटिव्ह
अकोला, दि.५(जिमाका)-जिल्ह्यात कोरोना संसर्गाची जलद चाचणी करणाऱ्या रॅपिड अँटीजन टेस्टचे ५०० किट प्राप्त झाले.आज या किट चा वापर सर्वप्रथम पातूर येथील स्वॅब कलेक्शन सेंटर वर करण्यात आला.याठिकाणी २२१ जणांचे नमुने तपासल्यानंतर त्यातील ११ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी दिली.
आज सर्वप्रथम रॅपिड अँटीजन टेस्ट पातूर येथे वापरण्यात आल्या. तेथे सर्वेक्षणा नंतर संदिग्ध व जोखमीचे वाटणारे व्यक्तींच्या चाचण्या झाल्या. त्यातील २२१ पैकी ११ चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान आज राज्य शासनाकडून पहिल्यांदा ५०० किट्स जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. नंतर २००० किट्स लगेचच प्राप्त होणार आहेत. विदर्भात रिपीड टेस्ट किट्सचा वापर अकोल्यात प्रथमतः होत आहे,हे ही डॉ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आता हे ११ रुग्ण हे कोणतेही लक्षणं न दिसणारे रुग्ण आहेत, त्यांना कोविड केअर सेंटरला निरीक्षणात ठेवून उपचार केले जातील, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी सांगितले.
पातूर येथे या चाचण्या पार पाडण्यासाठी तहसीलदार दीपक बाजड, न.प.मुख्याधिकारी सोनाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय जाधव व पोलीस निरीक्षक गजानन बायसठाकूर यांच्या संयुक्त पथकाने परिश्रम घेतले.
अशी होते रॅपिड अँटीजन टेस्ट
या चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला जातो. हा स्त्राव व्हिटीएम (Viral Transfer Media) द्रावणात मिसळला जातो. या द्रावणाचे किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला टाकला जातो. या पट्टीच्या दुसऱ्या टोकाला एक बारीक गुलाबी रेघ असते. सुमारे २५ ते ३० मिनिटात स्त्राव मिश्रीत द्रावण हे पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते. तर तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे,असे समजले जाते,असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
रॅपिड अँटीजेन टेस्ट मुळे तात्काळ तपासणी ची सोय झाली आहे. जिल्हाभरात या माध्यमातून जास्तीत जास्त तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण प्राथमिक अवस्थेतच ओळखता येतो. त्यामुळे लोकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या चाचण्यांना प्रतिसाद द्यावा. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी निर्धारित केल्यानुसार संदिग्ध व जोखमीच्या आणि दुर्धर आजार ग्रस्त लोकांनी आपले नमुने देण्यासाठी पुढे यावेत व तपासणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा