अकोट येथे आढावा बैठक प्राथमिक अवस्थेतील रुग्ण ओळखण्यात प्रशासनाला मदत करा जिल्हाधिकारी पापळकर यांचे खाजगी डॉक्टर्सना आवाहन

अकोला,दि. 13 (जिमाका)- अकोट शहरात कोविड संसर्गाचा फैलाव होत आहेत. संसर्ग ओळखून वेळेत रुग्ण उपचारासाठी आला की तो हमखास बरा होतो. त्यासाठी शहरात खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या संदिग्ध रुग्णांना ओळखून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे तात्काळ संदर्भित करावे व प्रशासनाला मदत करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
अकोट येथील तहसीलदार कचेरीजवळ पंचायत समिती सभागृहात आज कोरोना संदर्भातआढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे, पंचायत समिती सभापती लताताई नितोणे, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार गीते, मुख्याधिकारी अकोटकर, पोलीस अधिकारी तसेच शहरातील खाजगी डॉक्टर्स, नगरसेवक, मौलवी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी कोविडची लक्षणे, त्यासंदर्भात घ्यावयाची काळजी व याबाबत खाजगी प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्सने घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, रुग्ण लवकर ओळखणे ही कोरोना संसर्ग रोखण्याच्या व संसर्गित रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आपण बाधित रुग्णाला पूर्ण बरे करू शकतो, शिवाय संदिग्ध व व्याधीग्रस्त रुग्णांवर वेळेत उपचार सुरू केल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी रुग्ण प्राथमिक अवस्थेत ओळखण्यात डॉक्टर्सची भूमिका महत्त्वाची आहे.
नगरसेवकांची जबाबदारी महत्त्वाची
यावेळी उपस्थित नगरसेवकांना संबोधित करतांना जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, आपला स्थानिक पातळीवरील संपर्क वापरून रुग्ण ओळखण्यात, चाचण्या करण्यासाठी, उपचारासाठी प्रशासनाला सहकार्य करा. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व चाचण्या, सर्व उपचार सुविधांची सज्जता व उपलब्धता करण्यात आली आहे. नागरिकांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या जवळच्या ठिकाणी चाचणीची व्यवस्था केली जाईल.
मास्क अवश्य वापरा
शहरातील सर्व नागरिकांनी मास्क अवश्य वापरावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जे लोक मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी उपस्थित नगरसेवक व मौलवी यांनी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सूचना केल्या. या सर्व सूचनांचा प्रशासन सकारात्मक विचार करेल, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी आश्वस्त केले. यावेळी पोलीस बंदोबस्त आदि व्यवस्थाबाबत पोलीस अधीक्षक जी श्रीधर, तसेच ग्रामीण भागातील व्यवस्थेबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पवार यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ