श्रीराजराजेश्वर पालखी सोहळा मानाच्या एकाच पालखीचा सर्वमान्य पर्याय-पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय शिवभक्तांना घरीच जलाभिषेक व सोमवारी रक्तदान करण्याचे आवाहन




अकोला,दि.२२(जिमाका)- येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या श्री राजराजेश्वर पालखी सोहळा व कावड यात्रा कोविड १९ च्या पार्श्वभुमिवर यंदा केवळ एकच मानाची श्रीराजराजेश्वराची पालखी काढून करण्यात यावा,असा सर्वमान्य पर्याय मान्य करण्यात आला. तसेच शिवभक्तांनी आपापल्या घरीच पिंडीवर जलाभिषेक करावा व सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून  दर श्रावण सोमवारी रक्तदान करुन सेवा कार्य करावे,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी केले.
श्री राजराजेश्वर पालखी व कावड यात्रा सोहळा आयोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पालकमंत्री ना. कडू यांचे समवेत विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,मनपा आयुक्त संजय कापडणीस, राजेश्वर मंदिराचे विश्वस्त ॲड रामेश्वर ठाकरे, राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी तसेच विविध कावड पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी  उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मते मांडली. अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी सांगितले की, पालखी व कावड यात्रेची परंपरा ही संकटनिवारणासाठी सुरु झाली आहे. आताही आपण एका संकटाचा सामना करत आहोत. हे जागतिक संकट आहे. या संकटनिवारणासाठी आपले सगळ्यांचे योगदान असावे याहेतूने  मानाची एकच पालखी नेण्यात यावी व जलाभिषेक करण्यात यावा.
आ. नितीन देशमुख यांनी सांगितले की,  कोरोना सारख्या जागतिक संकटाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने काही निर्बंध घालून दिले आहेत. ते सगळ्यांना सारखेच आहेत.  मात्र शिवभक्तांवर निर्णय न लादता पालकमंत्री सर्वसमावेशक विचारविनिमयाद्वारे निर्णय घेत आहेत. कोरोनाचे संकट संपल्यावर पुढच्या वर्षी जोमाने पालखी सोहळा साजरा करु.
आ. गोपिकिशन बाजोरिया म्हणाले की,  अनेक वर्षांची ही परंपरा टिकली पाहिजे. त्यात खंड पडता कामा नये, लोकांच्या श्रद्धेचा आदर राखत प्रशासनाने मर्यादित संख्या व मर्यादित व्यक्तिंना सहभागी करुन घेऊन  सोहळा पार पाडण्यास परवानगी द्यावी. त्यात कोरोना प्रतिबंधासाठीच्या निर्बंधांचे पालन जसे सोशल डिस्टन्सचे पालन इ. शिवभक्त करतील.
आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले की,  महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन असणाऱ्या पंढरपूरच्या यात्रेचा आदर्श आपणही घेऊ या.  अगदी मोजक्या पालख्यांना परवानगी द्यावी. जागतिक संकट काळात श्रद्धेला प्राधान्य न देता हा संसर्ग थोपविण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करु या.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की,  कोरोना सारख्या संकटाशी आपण सारे लढत आहोत. तथापि, परंपरा असलेल्या पालखी सोहळ्याबाबत सर्वांच्या सहमतीने निर्णय व्हावा. वास्तविक शासनाच्या आदेशान्वये सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते  दैनंदिन पुजा व प्रार्थना सुरु असतात. हे संकट हे संसर्गजन्य आजाराचे संकट असल्याने आणि माणसे एकत्र आल्यानेच हा आजार पसरत असल्याने कुणालाही सवलत देता येणार नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना संसर्गाचा फैलाव होऊ न देणे  हे प्रशासनाचे आणि आपले साऱ्यांचेही आद्यकर्तव्य आहे.
पालकमंत्री ना. बच्चू कडू म्हणाले की, सध्याचे संकट हे देशावरचे संकट आहे. आपण जरी धर्मासाठी असलो तरी धर्म हा राष्ट्रासाठी असतो. राष्ट्र संकटात असतांना आपल्या श्रद्धेमुळे अन्य लोक धोक्यात येत असतील तर ते योग्य होणार नाही, हे तर देवालाही मंजूर नसेल. हा आजार नवीन आहे, या विषाणूचे आकलन पूर्णतः झालेले नाही. कोणताही धर्म हा मानवतेसाठीच आहे. अकोल्यातून काहीतरी चांगलं घडविण्याचा प्रयत्न करु या. यंदा एकच मानाची पालखी  निघेल व भक्त आपापल्या घरी जलाभिषेक करतील,असा सर्वमान्य पर्याय आपण निवडू या. तसेच यानिमित्ताने शिवभक्तांनी रक्तदान करावे असे आवाहनही ना. कडू यांनी केले.
या बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ