‘नायलॉन’ मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:दुखापतग्रस्त पक्षांना स्वयंसेवी संस्थेकडे उपचारार्थ सोपविण्याचे आवाहन

          अकोला, दि.३(जिमाका)- प्लास्टिक पासून बनविलेल्या नायलॉन मांजा  हा पशु पक्षी व मानवास दुखापती होण्यास कारणीभूत ठरत असल्यामुळे  अकोला जिल्ह्यात नायलॉन मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. दरम्यान अशा पतंगबाजीमुळे जखमी झालेले पक्षी वा जनावरे आढळल्यास त्यांना उपचारासाठी ‘सेव्ह बर्डस’ या सेवाभावी संस्थांकडे सोपवावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

             यासंदर्भात निर्गमित आदेशात म्हटले आहे की, नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्‍या पक्‍क्‍या धाग्‍यामुळे पक्षी व मानव जिवीतांस इजा होते.  तसेच पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्‍या धाग्‍यांचे तुकडे जमिनीवर पडतात व हे  तुकडे लवकर विघटन होण्‍याजोगे नसल्‍याने गटारे व नदीनाल्‍यासारख्‍या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात, तसेच गाय अथवा तत्‍सम प्राण्‍यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समविष्‍ट असलेले खाद्य सेवन केल्‍याने त्‍यांना प्राणघातक ठरतात.  तसेच अशा अपघटन (Non-Biodegradble) न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्‍या धाग्‍यांच्या अति वापरामुळे विजेच्‍या तारांवरील घर्षणामुळे होणाऱ्या ठिणग्‍यांनी लागणाऱ्या आगीमुळे विजप्रवाह खंडीत होवून विज केंद्रे बंद पडतात व त्‍यामुळे अपघात होणे, वन्‍यजिवांना धोका पोहोचणे तसेच जीवितहानी होण्‍याचा संभव असतो. तसेच या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपीठ नागपूर यांनी नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्‍यासाठी प्रत्‍येक शहरात विशेष पथक स्‍थापन करण्‍याचा आदेश दिला आहे व त्‍यानुसार बंदीचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून नायलॉन मांजा बंदीविषयी व्‍यापक जनजागृती करणेबाबत निर्देश दिले आहे.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण (संरक्षक) अधिनियम, १९८६ चे कलम ५ अन्वये आदेश जारी केले आहेत. त्यानुसार,

 

१.      प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्‍तूपासून बनविलेल्‍या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्‍या पक्‍क्‍या धाग्‍याच्‍या वापरावर बंदी घालण्‍यात यावी.

२.     घाऊक व्‍यापारी, किरकोळ व्‍यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्‍परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी ज्‍यायोगे संपूर्ण वर्षभरात त्याची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही.

३.     पतंग उडविण्‍यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणाऱ्या धोका, माती व पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध करण्‍यात यावा.

४.    पतंग उडवितांना केलेल्‍या मांजाच्‍या वापरामुळे विजेच्‍या तारांवर घर्षण होवून आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीतहानी होणे याबाबतची जनजागृती करण्‍यात यावी.

            नायलॉन मांजा बंदीच्‍या अनुषंगाने अकोला जिल्‍हयात व्‍यापक जनजागृती करणे व बंदीचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर जिल्‍हा पोलीस अधीक्षक यांचे मार्फत कार्यवाही करण्यात यावी,असेही आदेशात म्हटले आहे.  त्याअनुषंगाने तयार केलेल्या  विशेष पथकात  मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक, वनविभाग अकोला,  उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अकोला, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, अकोला यांचा समावेश असून या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांनी याबाबत अंमलबजावणी करावी तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दुखापतग्रस्त पक्षांच्या उपचारासाठी ‘सेव्ह बर्डस’ संस्थेचे सहकार्य घेण्याचे आवाहन

नायलॉन मांजामुळे पतंग उडवितांना आकाशात विहरणारे पक्षी तसेच  तुटलेल्या पतंगासोबत लटकलेल्या मांजामध्ये अडकूनही अनेक पक्षी जायबंदी होत असतात. अशा जखमी पक्षांना सेव्ह बर्डस अकोलाया संस्थेचे कार्यकर्ते उपचार करतात. त्यासाठी त्यांचा हेल्पलाई क्रमांक ७२४९४५९६६६ असा आहे. नागरिकांनी आपल्या जवळपास जखमी दुखापत ग्रस्त पक्षांना उपचारासाठी या संस्थेच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ