कोविडच्या पार्श्वभुमिवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

 


अकोला, दि.१७(जिमाका)- कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करुन सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.

जिल्ह्यातील विविध विषयांवर आज ना. कडू यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी,  जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरविंद आढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ घुगे, न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया तौलारे, सहा. नियोजन अधिकारी देशमुख, डॉ. आदित्य महानकर, डॉ. मनिष शर्मा तसेच अन्य अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते.

            जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येबाबत आढावा घेण्यात आला. शासनाच्या दिशानिर्देशानुसार,  रुग्णांवर करावयाच्या उपचार प्रणालीनुसार रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आवश्यक बेड, तसेच उपचार सुविधांबाबत माहिती देण्यात आली. सद्यस्थितीतील रुग्णवाढ लक्षात घेता भविष्यात अधिक उपचार सुविधांचे नियोजन करण्यात यावे. त्यासाठी मनुष्यबळ  उपलब्धतेसाठी भरती प्रक्रिया राबवून  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करावे,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. कंत्राटी कर्मचारी भरती करतांना कामगार कायद्यांचे पालन व्हावे, याबाबत अधिक दक्ष रहावे असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी ना. कडू यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत राबवावयाचे अभिसरण कामे, शाळांमधील शौचालयांची बांधकामे, आर्थिक वर्षात निधीतून करावयाची कामे याबाबत आढावा घेतला. निधी वेळेत खर्च करण्यासाठी यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे,अशी सुचनाही ना. कडू यांनी केली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ