असंघटीत कामगारांचे ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणीकरीता शिबीरांचे आयोजन करा; - जिल्हाधिकारी निमा अरोरा



अकोला,दि.13(जिमाका)- शासनाव्दारे असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी  ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी सुरु करण्यात आले आहे. ही नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी  प्रत्येक शासकीय विभागाने शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामागारांची ‘ई-श्रम पोर्टलवर  नोंदणी करुन घ्यावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

असंघटीत कामगारांचे ईश्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया गतिमान व्हावे याकरीता जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, शासकीय कामगार अधिकारी गौरव नालिंदे, दुकान निरीक्षक विनोद जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक अनिल चिंचोले,महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनिधी डॉ. सुनिल मानकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी एस.एन. मोपले,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक कै.जा.सोळंके तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी निर्देश दिले की, प्रत्येक शासकीय विभागाने निश्चित मुदतीत शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामगारांचे नोंदणी करुन घ्या. तसेच अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत स्थानिक स्तरावर नागरी सुविधा केंद्रामार्फत विशेष शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामगारांचे नोंदणी प्रक्रियेला गतिमान करा. विटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर  बाल मजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

नोंदणीकरीता पात्रता: असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्षे 16 ते 59 दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली कोणतीही बँक), सक्रिय मोबाईल नंबर (ओटीपीकरीता स्वत:चा अथवा कुटूंबातील अन्य व्यक्तीचा), स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

असंघटित कामगारांनी ई-श्रम पार्टलवर नोंदणी स्वत:, नागरी सुविधा केंद्र, कामगार सुविधा केंद्रावर किंवा eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. तसेच राष्ट्रीय हेल्पलाईन 14434 व टोल फ्री  18001374150 क्रमांकावर तसेच अधिक माहितीसाठी कामगार विभागाशी संपर्क  साधावा असे आवाहन  सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने  यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ