‘आत्मा’चा उपक्रमःसोमवारी (दि.९) रानभाजी महोत्सव

 अकोला,दि.८(जिमाका)- कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सोमवार दि.९ रोजी  'रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय परिसर, मुर्तिजापूर रोड येथे  सकाळी १० वाजेपासून सुरु होणार आहे.

 या कार्यक्रमाकरीता प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी तथा आत्मा नियामक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती निमा अरोरा, प्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ,प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. कांतप्पा खोत,प्रकल्प उपसंचालक (आत्मा) डी.एस.प्रधान  हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रानभाजी महोत्सवात रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.याठिकाणी (आत्मा) अंतर्गत स्थापित शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांची  विक्री सुद्धा करण्यात येणार आहे.

पावसाची रिपरीप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले दर्दी त्या आवर्जून खरेदी करतात. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की, या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा  रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये अकोला जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात येणार आहे. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना पोषणमूल्य असलेल्या भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

यावेळी रानातील मेवा म्हणून अंबाडी,चिवळी,केना,शेवगा, सुरण, करवंद,आघाडा.टरोटा,पिंपळ,भूई आवळा,करटोली, राजगुरा,वाघाटे, फांदीची भाजी,कुंजीर भाजी,चमकुराचे पाने,काटसावर,जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध राहणार आहेत.शहरातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवामध्ये भेट द्यावी असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा)डॉ. के.बी.खोत यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना