‘कंत्राटी पद्धतीने कुक्कुट पालन व्यवसाय अधिक हिताचा’ - उपमहाव्यवस्थापक डॉ. नाडगौडा

 


अकोला,दि.30(जिमाका)-   ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय अधिक हिताचा ठरू शकतो, असे प्रतिपादन वेंकीज इंडिया प्रा. लिमिटेड. चे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुनील नाडगौडा यांनी केले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन कुक्कुटपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुनील नाडगौडा बोलत होते. कुक्कुटपालनातून खेड्यातील बेरोजगारी कमी करता येऊ शकते तसेच अंडी व मांस सेवन करून ग्रामीण भागातील कुपोषण कमी करणे शक्य असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. दिनांक 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित  प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या उपस्थितीत झाले. शेतकरी, पशुपालक, बेरोजगार इत्यादी घटकांपर्यंत कुक्कुटपालन व्यवसायातील अद्यावत ज्ञान उत्तमपणे प्रसारित करण्याचे काम कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला मार्फत केले जात असल्याचे नमूद करत डॉ. सुनिल भिकाने यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधताना कुक्कुटपालन हे अगदी कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करावा व  नंतर व्यवसाय वाढवावा असे मत व्यक्त केले. संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे  यांनी प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन करताना भारतीय बाजारपेठेत मांस व अंडी उत्पादनास भरपूर वाव आहे.

कुक्कुट पालन व उद्योजकता विकासाची मानसिकता काळाची गरज या विषयावर जीव रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत कपले यांनी सविस्तर मार्गदर्शन करून तरुणांनी काळाची गरज ओळखून सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले. ऑनलाईन माध्यमातून सतत पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील इतर तज्ञ प्राध्यापकांनी कुक्कुटपालनातील विविध घटकांवर सविस्तर मार्गदर्शन व शंकां-निरसन केले. तसेच या कार्यक्रमात विदर्भातील  अग्रगण्य कुक्कुटपालन उद्योजक डॉ.शरद भारसाकळे यांनी कुक्कुटपालन व्यवसायात  स्वयंरोजगार निर्मिती व उद्योजकता विकासाची नामी संधी असल्याचे सांगितले.

 प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून एकूण 90 प्रशिक्षणार्थ्यानी सहभाग नोंदविला. तसेच  अकोला येतील नामांकित पोल्ट्री व्यवसायिक निलेश झोंबाडे यांनीही प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.  प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनाकरिता प्रशिक्षण समन्वयक डॉ.  एम. आर. वड्डे, सह-समन्वयक डॉ. सतीश मनवर, डॉ. प्रशांत कपले, डॉ. सुनील हजारे व  पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. निलेश लवटे यांनी अथक प्रयत्न केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ