प्रासंगिक लेखः- लष्करीअळीवरील उपाययोजना व व्यवस्थापन


नवीन लष्करीअळी वेगवेगळ्या 80 पिकांवर आढळुन येत आहे. उपजिविकेसाठी ही कीड मका पिकाशिवाय इतर पिकांवरही स्थलांतरीत होऊ शकते. मक्यावरील नवीन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली परंतु त्यानंतरही किड मक्याशेजारील कापुस पिकांवर स्थलांतरीत होत आहे. तसेच रब्बीतील पिकांवरही या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी कळविलेल्या उपाय योजना करुन कापूस, मका व ज्वारीवरील कीडीचा प्रादुर्भावाचे योग्य व्यवस्थापन करावे, असे कृषि विभागाने कळविले आहे.
त्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय अमरावती विभाग, अमरावती यांच्या मार्फत खालील जनजागृतीपर माहिती देण्यात आली आहे.
कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास पुढील उपाय करावे
प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करणे:- मका पिकाच्या अवशेषांमधील अळ्यांचे कपाशी व इतर पिकांवर होणारे संक्रमण रोखण्यासाठी मका पीक काढणीनंतर रोटावेटर च्या साह्याने अवशेषांचे बारीक तुकडे/भुगा केल्यास त्यावरील अळ्या व मातीतील कोष चिरडले जाऊन किडीचे नियंत्रण मिळण्यास मदत होईल. रोटावेटर मारण्यापूर्वी शेतातील अवशेषांवर मेटारायझीयम अनिसोप्ली 5 ग्रॅम अथवा नोमुरिया रिलायी 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रामाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी केल्यास रोटावेटर ने ते मातीत व्यवस्थित मिसळले जाऊन जैविक बुरशीद्वारे चांगले नियंत्रण शकेल. सध्या हवेतील आद्रातेचे अधिक प्रमाण हे जैविक बुरशीच्या वाढीसाठी पोषक आहे. मका पिकाचे अवशेष शेतात तसेच उभे किंवा बांधावर साठवून न ठेवता त्वरीत त्यांचा मुरघाससाठी वापर करावा.
यांत्रिक पध्दती: कपाशीचे प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंडे वेचून अळ्यासहित नष्ट करावेत जेणेकरुन, अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल.
रासायनिक पध्दती: पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त कपाशीवर स्पिनेटोरम 11.7 एस सी. @ 0.8 मिली अथवा क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 एस सी. @ 0.3 प्रति लीटर पाणी या प्रमाणे त्वरीत एफवारणी घ्यावी.
जैविक नियंत्रण: त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटाराझीयम अनिसोप्ली 5 ग्रॅम अथवा नोमुरिया रियाली 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. सध्या वातावरण जैविक बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्याने किडीचे परिणामकारक नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
कामगांध सापळयांचा निगराणीसाठी वापर: सध्या वाढीच्या अवस्थेतील अळ्या लवकरच कोषावस्थेत जाऊन त्यातून बाहेर निघणारे पतंग पुन्हा अंडी घालण्यास सुरुवात होईल. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पतंगांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे कामगंध सापहै उभारावेत. सापळ्यामध्ये पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याच्या 2-3 दिवसांनंतर शेतामध्ये पानांच्या खालच्या बाजूने लष्करी अळीचे अंडीपुंज दिसण्यास सुरुवात होते. त्यानुषंगाने वेळेत नियंत्रणाचे उपाय अवलंबवावेत.
अंडीपुंज व अळ्या गोळा करुन नष्ट करणे: पानांच्या खालच्या बाजूने असणारे लष्करी अळीचे अंडीपुंज व अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या सुरुवातीच्या अवस्थेतील समूहाने राहणाऱ्या अळ्या शोधून त्वरीत नष्ट कराव्यात. सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या ह्या फक्त पानेच खात असल्याने त्यांचा नायनाट केल्यास पुढे फुले व बोंडांना होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे.
मक्यावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापनः
देखरेख: प्रति एकरी 5 कामगंध सापळे उभारुन नियमित पाहणी करावी. ज्याठिकाणी मक्याचे क्षेत्र जास्त आहे तेथे पीक हंगामात तसेच पीक हंगामानंतरही कामगंध सापळे उभारुन त्यातील किडीच्या पतंगांची नियमित पाहणी करावी.
सर्वेक्षण: मका ऊगवून येताच सर्वेक्षणास सुरुवात करावी.
1)रोपावस्था ते सुरुवातीची शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 3-4 आठवडे): पीक वाढीच्या याअवस्थेत किडीचा प्रादुर्भाव 5 टक्के असल्यास उपाय योजना कराव्यात.
2)मध्य शेंडावस्था ते उशीराची शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 5-7 आठवडे): पीक वाढीच्या मध्य शेंडावस्थेत किडीचा नव्याने झालेला प्रादुर्भाव 10 टक्के असल्यास तसेच उशीराच्या शेंडावस्थेत नव्याने झालेला प्रादुर्भाव 20 टक्के असल्यास उपाय योजना कराव्यात.
3)फुलोरा/तुरा, कणीस उगवणे व त्यानंतरची अवस्था: पीक वाढीच्या या अवस्थेत रासानिक किटकनाशकांची फवारणी करु नये. कणसावर प्रादुर्भाव झाल्यास योग्य किटकनाशकांची फवारणी केली जाऊ शकते.
मशागतीय उपाय योजना-
1)उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडीच्या अवस्था वर येऊन पक्षी/उन्हामुळे नष्ट होण्यास मदत होते. 2)पीक पेरणी वेळेवर तसेच एकाच वेळी विस्तृत क्षेत्रावर (विभागी/झोनल) पेरणी करावी. वेगवेगळ्या वेळी पेरणी करु नये, त्यामुळे किडीस सतत खाद्य पुरवठा होऊन किडीचे जीवनच्रक अखंडीत सुरु राहते.
3)पिकांची फेरपालट करावी. सतत एकाच शेतात मका किंवा ज्वारी ही पिके घेऊ नयेत. मका पिकात तूर/उडीद/मूग यासारख्या कडधान्य पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी.
4)पीक वाढीच्या सुरुवातीलच्या अवस्थेदरम्यान (पेरणी पासून 1 महिन्या पर्यंत) प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत.
5)मका पिकाच्या भोवती सापळा पीक म्हणून नेपियर गवताच्या 3 ते 4 ओळींची लागवड करावी. तसेच सापळा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम अझाडीरॅक्टीन 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6)शेत स्वच्छ आणि तणमुक्त ठेवावे आणि खतांच्या शिफारशीत मात्रांचा वापर करावा.
7)कणसावर आवरण असलेल्या संकरीत वाणांची लागवड केल्याने किडीमुळे कणसाचे नुकसान कमी होईल.
यांत्रिक नियंत्रण पद्धती:
1)किडीचे अंडीपुंज व नवजात समुहातील अळ्या वेचव्यात व चिरडून टाकाव्यात अथवा रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
2)शेतात अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच मक्याच्या प्रादुर्भावीत पोंग्यात कोरडी रेती सोडावी.
3)पीक वाढीच्या सुरुवातीच्या तीस दिवसांत रेती+चुन चुनकळी यांचे 9:1 या प्रमाणातील मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे. 4)मोठ्या प्रमाणावर पतंग पकडण्यासाठी प्रति एकरी 15 कामगंध सापळे उभारुन त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत.
जैविक नियंत्रण पध्दती:
1)नैसर्गिक संरक्षण व संवर्धन करणे: मका पिकात कडधान्य, गळीतधान्य आणि शोभिवंत फुलझाडांची आंतरपीक म्हणून लागवड करावी, त्यामुळे पीक विविधता वाढून नैसर्गिक शत्रूंचे संरक्षण व संवर्धन होईल.
2)नैसर्गिक शत्रूंचे किटकांचे संवर्धनासाठी अथवा कामगंध सापळ्यात नवीन लष्करी अळीचे प्रति सापळा 3 पतंग सापडल्यास ट्रायकोग्रामा प्रिटीओसम किंवा टेलेनोमस रिमस या परोपजीवी किटकांची प्रति एकर 50 हजार अंडी प्रमाणे एक आठवड्यांच्या अंतराने प्रसारण करावे.
3)जैविक किटकनाशके: रोपावस्था ते सुरुवातीची शेंडावस्थेत (पीक ऊगवणी नंतर 3-4 आठवडे किडीचा प्रादुर्भाव 5 टक्के असल्यास आणि 10 टक्के कणसांचे नुकसान झाल्यास कीडरोगजनक बुरशी व जीवाणुंचा वापर करावा).
4)बॅसिलस थुरिजजिनसीस व्ही. कुर्सटकी 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 400 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे फवारणी करावी. तसेच, एनपीव्ही व कीडरोगजनक सुत्रकृमी यांचा वापर करावा.
रासायनिक नियंत्रण पद्धती:
1)बीज प्रकीया: सायंट्रेनिलिप्रोल 19.8 टक्के + थायामेथॉक्झाम 19.8 टक्के एफएस 6 मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रकीया केल्यास किडीच्या नियंत्रणाकरीता 15 ते 20 दिवसांसाठी प्रभावी ठरते.
2)रोपावस्था ते सुरुवातीची शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 3-4 आठवडे): नवीन लष्करी अळीमुळे 5 टक्के नुकसान असताना नियंत्रणाचे दृष्टीने किडीने घातलेल्या नवीन अंड्यांतून अळ्या बाहेर पडू नयेत म्हणून 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम अझाडीरॅक्टीन 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3)मध्य शेंडावस्था ते उशीराची शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 5-7 आठवडे): तुरा येण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत अळीमुळे 10 टक्केपेक्षा जास्त नुकसान असताना दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्यांच्या नियंत्रणाकरीता स्पिनेटोरम 11.7 टक्के एस.सी. किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. किंवा थायमेथॉक्झाम 12.6 टक्के+लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी. या किटकनाशकांची फवारणी करावी.
4)विष अमिषाचा वापर: 10 किला भाताचे तूस + 2 किलो गूळ + 2-3 लीटर पाण्याचे मिश्रण 24 तासासाठी आंबवावे व हे अमिष वापरण्याच्या अर्धातास आधी त्यामध्ये 100 ग्रॅम थायोडीकार्ब मिसळून पिकाच्या पोंग्यामध्ये सोडावे. या अमिषाचा वापर पीक वाढीची मध्य शेंडावस्था ते उशीराची शेंडावस्थेत तिसऱ्या व त्यापुढील अळी अवस्थेच्या व्यवस्थापनाकरीता करावा.
5)फुलोरा/तुरा, कणीस उगवणे व त्यानंतरची अवस्था (पीक ऊगवणी नंतर 8 आठवडे व त्यापुढे): पीक वाढीच्या या अवस्थेत रासायनिक औषधांद्वारे कीड व्यवस्थापन करणे आर्थिकदृष्टया किफायतशीर नसते. वर नमूद केलेल्या शिफारशीप्रमाणे जैविक किटकनाश्कांचा वापर करावा. किडीच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
औषधांची फवारणी पिकाच्या पोंग्याच्या दिशेने करावी, तसेच सर्व फवारण्या सकाळी अथवा संध्याकाळी ऊशीरा कराव्यात.
जनजागृती:
1)ध फवारणी न करता सोडून दिलेल्या प्रादुर्भावीत पिकापासून इतरत्र किडीचा फैलाव टाळण्यासाठी इतर भागातील पिकावर वेळेवर कीड नियंत्रण उपाय योजना कराव्यात.
2)कीड व्यवस्थापनाबाबत सर्व सहभागी संस्थांमार्फत विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार प्रसिध्दी करावी.
3)सामुदायिकपणे एकाच वेळी विस्तृत क्षेत्रावर कीड व्यवस्थापन करण्याची रणनीती अवलंबवावी.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ