दिव्यांग मतदारांची जनजागृती रॅली दिव्यांग मतदान करु शकता तर आपण का नाही?-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर








अकोला,दि.(जिमाका)- दिव्यांग मतदार मतदानासारखे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज आहेत, त्यांनी तसा निर्धार केलाय. इतकेच नव्हे तर आम्ही मतदान करु शकतो तर तुम्ही ही करा, अशी हाक ते देत आहेत. त्यांच्या या आवाहनाचा सकारात्मक विचार करुन ‘दिव्यांग मतदार मतदान करु शकतात तर आपण का नाही? असा प्रश्न सुदृढ व्यक्तिंनी स्वतःला विचारावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
        येथील दिव्यांग संघटनांच्या वतीने आज शहरातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अशोक वाटिका येथून ही रॅली रवाना झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा नोडल अधिकारी  रामेश्वर  वसतकर तसेच दिव्यांग संघटनांचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  
अशोक वाटिका येथून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आली. तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. तेथे  जिल्हाधिकारी पापळकर यांनी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी उपस्थित  मूक बधीर विद्यार्थ्यांना हा संवाद समाजावून सांगण्यासाठी  मुख्याध्यापिका सुषमा बोतकर व काळजीवाहक गब्बरसिंग राठोड यांनी आंतरसंवादक म्हणून काम केले व चिन्हांच्या भाषेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांचे मनोगत उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतूक केले तेव्हा साऱ्यांनी हात उंचावून आपला आनंद व्यक्त केला.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या क्षमता ओळखून मतदानाचा हक्क बजावावा. यानिमित्ताने विकासात योगदान देत असतात. हा विकास म्हणजे दिव्यांगांना मूळ प्रवाहात सामावून घेणे होय. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत  आपण सहभागी आहात.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘हम है युवा मतदार’ या गीताचे विमोचन करण्यात आले. हे गीत पडद्यावर उपस्थितांना दाखविण्यात आले. तसेच रमेश थोरात या विनोदी कलावंतांनी सादर केलेले विनोदी एकपात्री प्रयोगही उपस्थितांनी वाखाणला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक तायडे यांनी मानले.
दिव्यांग संघटना करणार मतदार जनजागृती
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना दिव्यांग मतदारांमध्ये तसेच अन्य मतदारांमध्ये १९ तारखेपर्यंत जनजागृती करणार आहे. त्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांचे वेळापत्रक याप्रमाणे-
रविवार दि. 6   रोजी आलेगांव , सस्ती, चांन्नी येथे भेटी व सभा ,  सोमवार दि. 7 रोजी  पारस ,गायगांव, निमकर्दा, व्याळा, व निंबा येथे दिव्यांग मतदारांच्या भेटी व सभा ,  बुधवार व गुरूवार दि. 9 व 10 रोजी  बार्शिटाकळी, महान, पिंजर, कान्हेरी सरफ येथे सभा व चर्चा तसेच  माना , कुरूम येथे दिव्यांग जनजागृती रॅली व मुर्तिजापुर येथे कॉर्नर सभा ,   शुक्रवार दि. 11 रोजी   अकोला शहरात  भेटी,  सभा व चर्चा,  शनिवार दि.12  अकोट तालुक्यातील चौहट्टा ,   देवरी फाटा,  मुंडगाव , पाथर्डी येथ भेटी व सभा , रविवार दि.13  अकोट तालुक्यातील सावरा मंचनपुर , आसेगांव , यवदा, शिवपूर बोर्डी येथे भेटी व चर्चा,   सोमवार दि. 14 रोजी  बाळापुर तालुक्यातील लोहारा, आडसुळ फाटा येथे चर्चा व सभा तसेच  तेल्हारा तालुक्यातील  दानापुर, हिवरखेड येथे भेटी चर्चा व सभा ,  मंगळवार दि. 15 रोजी  अकोट शहरात  भेटी  चर्चा व  कॉर्नर सभा, बुधवार दि. 16 रोजी  बाळापूर , पारस , वाडेगांव येथे दिव्यांग  मतदार जनजागृती बाबत पथनाट्य  गुरूवार दि. 17 रोजी सर्वच तालुक्यात एकाच दिवशी मतदान जनजागृती  व रॅली  व शपथ,  शुक्रवार दि.  18 रोजी अकोला शहरात दिव्यांग मतदान जनजागृती , पथनाट्य  तसेच  दिव्यांग महामेळावा  व हमीपत्र भरून घेणे , शनिवार  दि.  19 रोजी  गावस्तरावर प्रत्येक  दिव्यांग प्रमुख  नोंदणी झालेल्या दिव्यांगाना ओळखपत्र वाटप करतील व शेवटी समारोप सभा होईल.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ