विधानसभा निवडणूक-२०१९- पत्रकार परिषद: निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.७(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ साठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी व मतदारांमध्ये मतदान हक्काबाबत जनजागृती याबाबींवर विशेष भर दिला जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. निर्भय व निष्पक्ष निवडणूकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे,असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे विमोचन करण्यात आले.
विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने माध्यमांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते.
माघारीनंतर जिल्ह्यात ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी माहिती दिली  की, आज उमेदवारी मागे घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिनांकास उमेदवारी अर्ज मागे घेतल्‍यानंतर अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  त्यात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे १६, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे  २६ व अपक्ष २६ उमेदवारांचा समावेश आहे.
१८७६ पथकांची नियुक्ती
त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीकरिता एकुण १८७६ मतदान पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून त्‍यांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण झाले असून व्दितीय प्रशिक्षण शनिवार दि.१२ ते मंगळवार दि.१५ दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले आहे.  रविवार दि.२० रोजी मतदान पथके  संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मुख्‍यालयावरुन  नियोजित मतदान केंद्रावर रवाना होतील. मतदान पथकांच्या परिवहन व्‍यवस्‍थेकरिता २०९ एस. टी. महामंडळाच्या बसेस भाडे तत्त्वावर घेण्‍यात येणार असून उर्वरीत वाहने शासकीय/ निम शासकीय कार्यालयाकडून अधिग्रहीत करण्‍यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार खाजगी वाहने सुद्धा मतदान पथकांच्या परिवहन व्‍यवस्‍थेकरिता वापरण्‍यात येणार आहे.
मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ पूर्ण
मतदान करीता प्राप्‍त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे First Level Checking जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ईव्‍हीएम गोदाम येथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची पहिली सरमिसळ (Randomization)मंगळवार दि.१ रोजी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत करण्‍यात आली   असून  सरमिसळ (Randomization) करण्‍यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांना हस्‍तांतरीत करण्‍यात येत आहेत.
१८६ मतदान केंद्रांचे होणार वेबकास्टींग
आदर्श आचारसंहिता लागु झाल्‍यापासून जिल्ह्यात ६७५ झेंडे,४६०८ फलक/ पोस्‍टर्स/ बॅनर्स काढून टाकण्‍यात आले आहेत. रविवार दि.६ पर्यंत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्‍या बाबत एकही गुन्ह्याची नोंद करण्‍यात झालेली नाही, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका पार पाडण्‍याकरिता एकुण १४७ झोनल ऑफीसर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.आचारसंहिता अंमलबजावणी करिता  २६ भरारी पथक २७ स्थिर सर्वेक्षण पथक १६ व्हिडीओ सर्वेक्षण पथक व ७ व्हिडीओ पाहणी पथक गठीत करण्‍यात आले आहे. जिल्ह्यातील १८६ मतदान केंद्राचे ठिकाणी वेब कास्‍टींग करण्‍यात येणार आहे.
‘स्वीप’द्वारे जनजागृती
निवडणूक मुक्‍त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी मतदारांमध्‍ये स्‍वीप कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच कोणत्‍याही अपप्रचाराला किंवा आमीषला बळी न पडता स्‍वतःच्‍या विवेकबुद्धीने मतदान करण्‍याबाबत मतदारांना आवाहन करण्‍यात येत आहे.
३९४ शस्त्रे जमा
 तसेच जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांना त्‍यांचेकडील शस्‍त्र जवळच्‍या पोलिसस्‍टेशन मध्‍ये जमा करण्याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.आता  पर्यंत ३९४ शस्‍त्रे जमा झाले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अवैध मद्यविक्रीला आळा
कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने पोलीस प्रशासना मार्फत आवश्‍यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्‍यात आला असून अवैध दारु भट्टी व अवैध धंदे इ. बाबत धाडसत्राव्‍दारे प्रतिबंधात्‍मक कार्यवाही सुरु आहे. आता पर्यंत राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागातर्फे ७ प्रकरणात सहा लाख २७ हजार ६७६ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ८१६ लिटर अवैध दारु जप्‍त करण्‍यात आली आहे.  तसेच पोलीस विभाग/ भरारी पथकांकडून एकूण ११६ प्रकरणात  दोन लाख २३ हजार १६१ रुपये  किंमतीच्या मुद्देमालासह ११२८  लिर्स अवैध दारु  जप्‍त करण्‍यात आली आहे.  भरारी पथकाने एकू दोन प्रकरणात रुपये सात लाख आठ हजार ८८५ रुपये  एवढी रोख रक्‍कम जप्‍त केली आहे.
CVIGIL अॅप, टोल फ्री क्रमांक सुविधा उपलब्ध
नागरीकांना सुद्धा कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्‍यास त्‍याकरिता CVIGIL अॅपव्‍दारे त्‍याबाबतची तक्रार करण्‍याकरिता आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. आतापर्यंत CVIGIL अॅपव्‍दारे पाच तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून प्राप्‍त पाचही  तक्रारींचे निरसन करण्‍यात आले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० वर आतापर्यंत २२१ नागरीकांनी सपंर्क साधला असून त्‍यांनी विचारलेली माहिती त्‍यांना पुरविण्‍यात आली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधिक्षक गावकर यांनी निवडणूक काळात जिल्ह्यात पुरविण्यात आलेल्या जादा बंदोबस्त व केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या सहा तुकड्यांची जादा कुमक येणार असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे विमोचन
विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मागील निवडणूकांच्या मतदानाची आकडेवारी व अन्य अनुषंगिक माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ