विधानसभा निवडणूक- २०१९: स्वतः मतदान करा व इतरांनाही करायला सांगा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला, दि.२(जिमाका)- जिल्ह्यात विधानसभा निवडणूक ही निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा काटेकोरपणे प्रयत्न करीत आहे. या सर्व तयारीचे फलित हे मतदारांनी  मतदान करण्यात आहे. तेव्हा नागरिकांनी स्वतः मतदान करावे व आपल्या कुटूंबातील, अवती भवती सर्व लोकांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची घेतलेली मुलाखतः-
१)अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची रचनेबाबत आपण काय माहिती द्याल?
जिल्हाधिकारी पापळकर- अकोला जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.२८अकोट, २९ बाळापुर,३०अकोला पश्चिम,३१ अकोला पूर्व, ३२ मुर्तिजापूर. अकोला जिल्ह्याची सिमा ही कोणत्याही राज्याशी संलग्न नाही. जिल्ह्याची सिमा ही अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांशी संलग्न आहे.
२) जिल्ह्यातील या पाचही विधानसभा मतदार संघातील मतदार संख्येचे विवरण कसे आहे?
जिल्हाधिकारी पापळकर-  जिल्ह्यात एकूण १५ लाख ७४ हजार ०९१ इतके मतदार आहेत. त्यात  ७ लाख ६१ हजार ८६४ महिला तर ८ लाख १२ हजार १८१ पुरुष आणि ४६ इतर मतदार आहेत. या शिवाय जिल्ह्यात एकूण तीन हजार १६३  सर्व्हिस मतदार आहेत. असे एकूण १५ लाख ७७ हजार २५४ मतदार या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. सर्व मतदारांच्या माहितीसाठी  सांगतो की, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकता.
३) अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांवर मतदान केंद्र व्यवस्था कशी आहे?
जिल्हाधिकारी पापळकर- लोकसभा निवडणूक २०१९ करिता एकूण मूळ मतदान केंद्र १६८० होते ७१ सहाय्यकारी मतदान केंद्र होते तथापि सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या आता कमी होऊन२३ इतकी झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण १७५१ मतदान केंद्र होते ती संख्या आता १७०३ इतकी झाली आहे. थोडक्यात या विधानसभा निवडणूकीसाठी १७०३ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहे.
४) जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी किती मनुष्यबळ आवश्यक आहे? त्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे?
जिल्हाधिकारी पापळकर- या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख व तीन मतदान अधिकारी नेमले जातात. याशिवाय क्षेत्रिय अधिकारी व विविध पथके देखील नेमले जातात. निवडणुकीच्या कामाकरिता जिल्ह्यामध्ये एकूण ९ हजार ४६१ अधिकारी कर्मचारी यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे विविध टप्प्यांवरील प्रशिक्षण ही सुरु आहे.
५) निवडणूकीतील पारदर्शकता जपण्यासाठी मतदान यंत्रांची सरमिसळ ही प्रक्रिया किती टप्प्यात पार पाडली जाते?
जिल्हाधिकारी पापळकर-निवडणूक अधिक पारदर्शक होण्यासाठी मतदान यंत्रांची सरमिसळ(randomization) होणे आवश्यक असते. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडते. त्यात ईव्हीएम मशीन चे पहिले randomization १ ऑक्टोबर रोजी पार पडले आहे. उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर दुसरे randomization करण्यात येईल. ही प्रक्रिया करतांना राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित असतात. दुसऱ्या randomization साठी  निवडणूक आयोगाने नेमलेले निरीक्षकही उपस्थित राहतात.
६)विधानसभा निवडणूकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे?
जिल्हाधिकारी पापळकर-निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याकरिता अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आचार संहिता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे बॅनर पोस्टर काढण्या बाबतची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी व्हिडीओ पाहणी पथक, स्थिर पाहणी पथके, फिरते पथक तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण २६ भरारी पथके, २७ स्थिर पथके, १६ व्हिडीओ सर्वेक्षण पथक आणि ७ व्हिडीओ पाहणी पथके कार्यरत असून, असे एकूण ७६ पथके आचारसंहिता अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवून आहेत.
७) निवडणूक प्रचारात उमेदवारांकडून होणाऱ्या प्रसार माध्यम  वापरा बाबत कसे लक्ष ठेवले जाणार आहे?
जिल्हाधिकारी पापळकर-आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचा भाग म्हणून प्रत्येक उमेदवाराने  करावयाच्या प्रचारावरही निवडणूक यंत्रणेची नजर असणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आपल्या रेडीओ- टेलिव्हिजन तसेच सोशल मिडीयावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी हे नोडल अधिकारी असून माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे गठण करण्यात आले आहे. माध्यम संनियंत्रण कक्ष सुरु असून त्याद्वारे वेगवेगळ्या वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या बातम्या व जाहिराती. रेडिओ वाहिन्या, केबल वाहिन्यांच्या प्रसारणावर लक्ष ठेवले जात आहे.  याच सोबत paid news  संदर्भातही लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठीही स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे.
८) निवडणूक काळात मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कसे नियोजन केले आहे?
जिल्हाधिकारी पापळकर- कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यात पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक अपर पोलीस अधिक्षक, चार पोलीस उपअधिक्षक, २४ पोलीस निरीक्षक, ६९ एपीआय, पीएसआय दर्जाचे अधिकारी, १६०० पोलीस कर्मचारी, याशिवाय ७०० पुरुष  आणि १०० महिला होमगार्ड यांचीहीमदत घेतली जाणार आहे. या शिवाय राज्य राखीव दलाच्या तीन व केंद्रीय राखीव दलाच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी राहणार आहेत. या शिवाय प्रतिबंधात्मक कारवाई, खाजगी परवानाधारकांची शस्त्रे जमा करणे यासारख्या कारवायाही करण्यात आल्या आहेत. एकूणच निवडणूक निर्भय व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.
९)दिव्यांग मतदारांसाठी आपण विशेष व्यवस्था करुन दिव्यांगांचे मतदान अधिकाधिक व्हावे यासाठी प्रयत्नशिल आहात, आपल्या या प्रयत्नांबद्दल माहिती द्यावी.
जिल्हाधिकारी पापळकर- दिव्यांग मतदारांसाठी स्वयंसेवकांची नेमणूक, मोफत वाहतुक सेवा,  प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर,  त्यांची येण्या जाण्याची वेळ विचारुन त्यानुसार वाहन उपलब्धता करण्यात येणार आहे.  रांगेत  दिव्यांगांना उभे राहण्याची वेळ येऊ न देता त्यांना प्राधान्याने प्रथम मतदान करता येणार आहे. विशेष म्हणजे अकोला शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी स्वयंप्रेरणेने ‘एक दिवस दिव्यांगांसाठी’ या उद्देशाने सेवाभावी वृत्तीने मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत व पुन्हा घरी परत अशी मोफत सेवा देणार आहेत. निवडणूक यंत्रणेच्या सहकार्यातून ते हा उपक्रम राबविणार आहेत.
१०) मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जनजागृती (SVEEP)चे काय उपक्रम जिल्ह्यात सुरु आहेत?
जिल्हाधिकारी पापळकर-जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी स्वतंत्र स्वीप समिती तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे  मतदारांमध्ये जनजागृतीसाठी  पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रभात फेऱ्यांचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यात विशेषत्वाने  अभिरुप मतदान घेण्यात आले.  जिल्ह्यातील    महाविद्यालयांमध्ये १० हजारांहून अधिक नवतरुण तरुणींनी या अभिरुप मतदानात सहभाग घेऊन मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला.  अकोला जिल्ह्यातील हा उपक्रम अतिशय यशस्वी ठरला. या शिवाय जिल्ह्यात मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र यांचे प्रात्यक्षिकही गावोगावी जाऊन दाखविण्यात आले.  जिल्ह्यात १७५१ चुनाव पाठशाला आयोजित करण्यात आल्या. तर ३५५ मतदार साक्षरता क्लब स्थापण्यात आले. या सर्व पातळ्यांवर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
११) या निमित्ताने आपण मतदारांना काय आवाहन कराल?
जिल्हाधिकारी पापळकर- मतदारांनी कोणत्याही दबावाला, प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. गरोदर महिला, दिव्यांग, वृद्ध ,नवमतदार यांनीही आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावावा.प्रत्येक मतदाराने इतरांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावे. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मतदान करण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. स्वतः मतदान करा आणि इतरांनाही करायला सांगा. आपले मतदान अधिक सुकर व्हावे यासाठी  मतदारांनी आपले मतदान केंद्र कोणते आहे? ते वोटर हेल्पलाइन ॲप चा वापर करून आधीच शोधून ठेवावे. आपल्या सुविधेसाठी १९५० हा विनाशुल्क हेल्पलाईन  दूरध्वनी क्रमांक  कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेवेचा लाभ घेऊन आपण आपल्या मतदानाविषयी माहिती घेऊ शकता. तरी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा.
-संकलनःजिल्हा माहिती कार्यालय,अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ