अकोल्यातल्या लेकरांना स्पॅनिश ‘मायेची ऊब’: अनाथांच्या जीवनात ममतेचे प्रकाशपर्व


अकोला,दि.२२(डॉ.मिलिंद दुसाने)-कधी लेकरं मायेची ऊब शोधतात तरी कधी मायेची ऊब लेकरांना शोधते. हे दोघे शोध घेत जेव्हा एकत्र येतात तेव्हा जन्मते हृदयस्पर्शी कहाणी. या हृदयस्पर्शी कहाणीतली लेकरं आहेत अकोला जिल्ह्यातली  आणि या गोंडस पाखरांना आपल्या पंखाखाली घेऊन मायेची ऊब देणारी माऊली आहे स्पेन देशातली. ही भेट घडवून अनाथ बालकांच्या जीवनात ममतेच्या प्रकाशपर्वाचा  नव्या अध्यायाची सुरुवात करण्यात प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मोलाची भुमिका बजावत प्रशासनाचा मानवी चेहरा अधिक उजळ केला आहे.
अकोल्यातली दोन गोजिरवाणी निरागस मुलं शुभांगी आणि आकाश. बालपणापासून नशिबी आले ते दुर्दैवाचे दशावतार.  जन्म घेऊन जगात आले नाही तोच जन्मदात्याच्या मृत्यू. कुटूंबाचा आधारच कोसळला. मुलांची आई मुलांना घेऊन माहेरी आली. तरुण विधवा मुलीच्या पुनर्वसनाचा विचार करुन म्हाताऱ्या आजीने ह्या मुलांच्या आईचा पुनर्विवाह करुन दिला. मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी म्हाताऱ्या आजीनं घेतली खरी पण इथली परिस्थिती ही गरिबीची. गरिबीवर आजीची माया मात करत होती. त्यात एक मामा व्यसनी, तर दुसरा मानसिक रुग्ण. मुलांची आई आपलं नवं आयुष्य सुरु करायला गेली नाही तोच आजीनंही हे जग सोडलं. पुन्हा मुलांचं मायेचं छत्र हरवलं. आईचं काळीज तुटत होतं पण सावत्र बाप या लेकरांना स्विकारायला तयार नव्हता.  परिणामतः इकडे मुलांची आबाळ सुरु झाली. व्यसनी मामाने या लेकरांना अक्षरशः भिकेला लावलं. त्यांच्या भिकेवर तो जगू लागला. दररोज ही लेकरं केविलवाणी  फिरत.  तिथल्या एका सदगृहस्थाला त्यांची दैना पहावली नाही.  त्यांनी  याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी करुणा महांतारे यांना सांगितले. त्यानंतर सुरुवात झाली ती या मुलांचे दुर्दैवाचे दशावतार संपायला. इथून सुरु होते त्या दोन बालकांच्या जीवनातील जिव्हाळ्याच्या पालकत्वाचं प्रकाशपर्व सुरु होण्याची कहाणी.
बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे माहिती येताच ‘त्या’ मामाच्या ताब्यातून बालकांची सोडवणूक करण्यात आली. तेथून ती बालके अकोला शहरातील मलकापूर भागातल्या उत्कर्ष शिशू गृहात दाखल करण्यात आली. त्यावेळी आकाश एक वर्षाचा आणि नंदिनी तीन वर्षांची होती.
या बालकांची आई जिवंत असल्याने त्यांना अनाथ घोषित करण्यात कायदेशीर अडचण होती. त्यासाठी त्यांच्या जन्मदात्या आईने मुले शासनाला समर्पित केल्याचे  प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक होते. त्यासाठी थेट मध्यप्रदेश गाठावा लागला. तेथे त्या आईला गाठून तिला समुपदेशन देऊन ही प्रक्रियाही पूर्ण करुन घेतली. आता मुलं कायदेशीररित्या शासनाच्या छत्राखाली होती.
दरम्यान मुलांना जिव्हाळ्याचं पालकत्व स्पेन देशातून हुडकत होतं. मार्टिन थॉमस गिराओ आणि श्रीमती रॅक्वेल वेरा ॲग्विलोरा हे स्पेन मधल्या इबिसा शहरातील दाम्पत्य.  हे दाम्पत्य अपत्यासाठी आसुसलेलं. त्यांनी आफा’  (Authorized foreign Adaption Agency-AFAA) या आंतरराष्ट्रीय दत्तक पालकत्व प्रक्रियेचे काम करणाऱ्या संस्थेकडे नाव नोंदविले होते. भारत सरकारच्या ‘कारा’ (Central Adaption Resource Agency-CARA)  मार्फत अनाथ  बालकांना कुटुंब देण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना  विशेष दत्तक संस्थेमधील  बालकासाठी कुटूंब व पालकाचा शोध घेतला जातो. यातूनच काराआफायांच्या समन्वयाने  स्पॅनिश दाम्पत्यासाठी  शुभांगी व आकाश या  बालकांना निश्चित करण्यात आले.  या स्पॅनिश दाम्पत्याला भारतीय संस्कृतीविषयी आदर असल्याने त्यांनी भारतीय बालकांची निवड केली. शुभांगी आणि आकाश हे सख्खी भावंड असल्याने त्यांची ताटातुट करणं कायद्यान्वये अशक्य होतं. तथापि, या दाम्पत्याने दोन्ही मुलांना दत्तक घेण्याचा  निर्णय घेतला.  विविध कायदेशीर प्रक्रिया व चौकशा पार पडल्यानंतर  तब्बल दोन वर्षांनी ही मुलं गेल्या सोमवारी म्हणजे १४ तारखेला पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. त्यासाठी हे स्पॅनिश दाम्पत्य अकोल्याला येऊन गेलं. उत्कर्ष संस्थेतल्या बालकांनी अत्यंत हृद्य असा निरोप आपल्या या दोन सवंगड्यांना दिला.  हा भावस्पर्शी प्रसंग, हृदय हेलावणारा होता. आता ही मुलं सुरक्षित, संपन्न आणि सहृदय पालकांच्या उबदार कुशीत वाढतील, मोठी होतील. या प्रसंगी  जिल्हा महिला बालविकास अधिकारी  योगेश जवादे, बाल संरक्षण अधिकारी करुणा महांतारे, संस्थेचे अध्यक्ष दादा पंत, हेमंतभाई चौधरी, आश्विनी सुजदेकर, तसेच ‘कारा’चे प्रतिनिधी दिलीपकुमार आदी मान्यवरही आवर्जून उपस्थित होते.
 स्पेन देशातील कायद्यानुसार, इथून गेल्या गेल्या आठ दिवसांत या लेकरांना स्पेनचं नागरिकत्व मिळेल, तसेच दत्तक झाल्यापासून या पालकांच्या संपत्तीत अधिकारही मिळाला आहे.  मार्टिन आणि रॅक्वेल हे दाम्पत्य इबिसा या शहरात एका बॅंकेत अधिकारी म्हणून काम करतात. आर्थिक सुबत्ता असणाऱ्या या दाम्पत्याच्या जीवनात फक्त घरात बालकांच्या किलबिलाटाची उणीव होती. आकाश आणि नंदिनी यांच्या रुपाने ती भरुन निघाली.  मुलांना स्पेनला नेल्यानंतर पहिले सहा महिने मार्टिन तर  रॅक्वेल एक वर्षभर काम न करता पूर्णवेळ मुलांसोबत घालवणार आहेत. त्यांचे शिक्षण, त्यांच्याशी संवाद जुळवून घेणे यासाठी त्यांनी एका भाषा व मानस समुपदेशन तज्ज्ञांची सेवा घेतली आहे.  हे तज्ज्ञ मुलांचा मराठी ते स्पॅनिश हा भाषा प्रवास सुकर करतील. मग या मुलांचे  शालेय शिक्षण सुरु होईल. दुर्दैवाचे दशावतारांचे सुंदर सुरक्षित जीवनात झालेले हे स्थित्यंतर सहृदय प्रशासन आणि संस्थांच्या मुळे सुकर झालं. या दोघा बालकांच्या सुखी समृद्ध जीवनाला आणि ममतेच्या प्रकाशपर्वाला स्पॅनिश पंखांखाली सुरुवात झाली, हेच महत्त्वाचे.
अशी होते दत्तक प्रक्रियाः
‘आफा’  (Authorized foreign Adaption Agency-AFAA) ही संस्थाआंतरराष्ट्रीय दत्तक पालकत्व प्रक्रियेचे काम करणारी संस्था आहे. तर भारतात  भारत सरकारच्या ‘कारा’ (Central Adaption Resource Agency-CARA)  ही संस्था आंतरदेशीय व देशांतर्गत दत्तक पालकत्व प्रक्रियेचे काम करते. देशात जिथं जिथं म्हणून शासनाच्या अनुदानित  अनाथाश्रमात  कायदेशीर रित्या अनाथ असलेली बालकांची माहिती  ‘कारा’ च्या  www.cara.gov.in  या संकेतस्थळावर अपलोड केली जाते. या वेबसाईटद्वारे ज्या विदेशी पालकांची ‘आफा’ कडे नोंदणी असते; त्या पालकांना मुलांची माहिती दाखविली जाते. देशातील पालकांची काराकडे नोंदणी केली जाते. मुल दाखवल्यानंतर ४८ तासात पालकांना आपलं मुल नक्की करावं लागतं  त्यानंतर २० दिवसांत त्यांनी संस्थेशी संपर्क करावयाचा असतो. त्यासाठी या पालकांना भारतात येऊन काराच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागते. तेथे त्यांचे सर्व कागदपत्रे तपासली जातात. याच वेळी तेथे त्यांची प्रत्यक्ष मानसिकता ही तपासली जाते. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष मुल दाखवले जाते. प्रत्यक्ष भेटी नंतर मग त्यांचे दत्तक पालकत्वासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केला जातो.  यावर न्यायालय दोन महिन्यांपर्यंत प्रक्रिया व तपास पूर्ण करुन  मान्यता देते. मगच या  मुलांचे नवे पालक म्हणून संबंधित दाम्पत्याची नोंद होते. तसा जन्मदाखला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळतो.  या दरम्यान हे दत्तक पालक हे निरीक्षणाखाली असतात.  ही सर्व प्रक्रिया बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये केली जाते. जिल्ह्याचे जिल्हा महिला  बालविकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे दोन अधिकारी ही प्रक्रिया पार पाडत असतात.  नंतर कोर्टाच्या आदेशाने पासपोर्ट व्हिसा तयार होऊन मग  ही मुलं १४ तारखेला पालकांच्या स्वाधीन करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ