शाळकरी विद्यार्थी आज भरणार मतदार जनजागृतीचे रंग: मानवी रांगोळी साकारुन करणार प्रबोधन


             अकोला,दि.१८(जिमाका)-  विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृतीसाठी शनिवार दि.१९ रोजी  शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी  होऊन मतदार जनजागृतीचे रंग भरणार आहेत. यासोबतच हे सर्व विद्यार्थी मानवी रांगोळी साकारुन  मतदार जनजागृती बाबत प्रबोधन करणार आहेत.
मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रमाअंतर्गत  मतदार जागृती रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१९ रोजी  सकाळी आठ वाजता लालबहादूर स्टेडीयम  येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  अकोला शहरातील ८० विद्यालयांतील इयत्ता ७ वी, ८ वी  व ९ वी या वर्गातील  सुमारे १० हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील.
या स्पर्धेचा शुभारंभासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रंगभरण स्पर्धेनंतर शास्त्री स्टेडियमच्या मैदानावर मानवी रांगोळी साकारुन प्रबोधन केले जाणार आहे, अशी माहिती स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश अंधारे यांनी दिली आहे.
  या स्पर्धेत सहभागी  विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून ड्रॉइंग शीट पुरविण्यात  येणार असून  रंगभरणाचे साहित्य विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे. रंगभरणासाठी विद्यार्थी रंगीत पेन्सिल, क्रेऑन पेन्सिल, वॉटर कलर इ. कोणतेही साहित्य वापरू शकतात.  स्केच पेन चा मात्र वापर करता येणार नाही,असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ