पत्रपरिषदः मतदानासाठी यंत्रणेची सज्जता; मतदारांनी आपला हक्क बजवावा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


अकोला,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे सांगितले. विधानसभा निवडणूक २०१९ चा जाहीर प्रचार आज सायंकाळी संपला.  त्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पापळकर  यांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी माहिती दिली की, भारत निवडणुक आयोगाने घोषित केलेल्‍या निवडणूक कार्यक्रमानुसार  सोमवार दि. २१ रोजी मतदान होणार असून  आयोगाने मतदानाची वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० ठरवून दिलेली आहे.
 जिल्ह्यात खालील प्रमाणे मतदान केंद्र निश्चित-
विधानसभा मतदार संघाचे नाव
मतदान केंद्राची संख्‍या
२८-अकोट
३३१
२९-बाळापुर
३३६
३०-अकोला पश्चिम
३००
३१-अकोला पूर्व
३५०
३२-मुर्तिजापुर
३८६
एकूण
१७०३
लोकसभेच्‍या निवडणूकीत अस्तित्‍वात असलेल्‍या काही मतदान केंद्राचे ठिकाणात बदल करण्‍यात आला असून त्‍या बाबतची सुचना पूर्वीचे मतदान केंद्राचे ठिकाणी लावण्‍यात आली असून नविन मतदान केंद्राचे सुचना फलक ठिकाणी लावण्‍यात आलेला आहे जेणे करुन मतदारांची गैरसोय होणार नाही.
मतदान पथकांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था
                         मतदान पथके नेमुन दिलेल्‍या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्‍यालयावरुन नियोजित मतदान केंद्रावर रवाना होणार असून मतदान पथकांचे परिवहन व्‍यवस्‍थेकरीता एस.टी महामंडळाची १९४  बसेस, ८४ मिनी बसेस व १८३ जीप गाड्या वापरण्‍यात येणार आहेत.
ओळखीसाठी ११ पुरावे ग्राह्य
निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रा व्‍यतिरीक्‍त मतदानाची ओळख पटविण्‍याकरीता खालील नमुद ११ पुराव्‍याला मान्‍यता दिली असून सदर पुराव्‍यांपैकी कोणताही पुरावा मतदाराची ओळख पटविण्‍याकरीता ग्राह्य धरण्‍यात येईल.
१.       पासपोर्ट
२.      वाहन चालक परवाना
३.      छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र / राज्‍य शासन/ सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र)
४.     बॅंक / पोस्‍ट व्‍दारा वितरीत छायाचित्र असलेले पासबुक
५.      पॅन कार्ड
६.      रजिस्‍ट्रार जनरल ऑफ इंडीया यांचे व्‍दारा नॅशनल पाप्‍युलेशन रजिस्‍टर अंतर्गत निर्गमित स्‍मार्ट कार्ड
७.     मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड
८.       भारत सरकारच्‍या श्रम मंत्रालयाच्‍या योजनेंतर्गत निर्गमित हेल्‍थ इन्‍श्‍युरन्‍स स्‍मार्ट कार्ड
९.      छायाचित्र असलेले निवृत्‍ती वेतन कागदपत्र
१०.  मा. खासदार/ मा. आमदार यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
११.   आधार कार्ड
विधानसभा निवडणूकीकरीता निवडणूक आयोगाने अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांसाठी पाच निवडणूक निरीक्षकांची नेमणुक केली आहे.
टोल फ्री क्रमांक व ॲपच्या माध्यमातून माहिती व तक्रार निवारण
मतदारांच्या विविध शंकांच्या निरसनासाठी व माहिती मिळविण्याकरिता १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित आहे. या क्रमांकावर आतापर्यंत ४२१  नागरिकांनी संपर्क साधून माहिती घेतली आहे. नागरीका करिता निवडणूक आयोगाने तयार केलेल्‍न्‍या CVIGIL  अॅपचे माध्‍यमातून आता पर्यंत १७ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून प्राप्‍त सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात आलेले आहे.  त्‍याच प्रमाणे  पोर्टलवर ८४२ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून आतापर्यंत ८३८ तक्रारींचा निपटारा करण्‍यात आला असून ४ तक्रारी प्रलंबित आहेत.
मतदानाच्या दिवशी सुट्टी
 प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे याकरिता शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी,असे आदेश दिले आहेत. ही  सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व स्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहील, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल असेही शासनाने जाहीर केले आहे,असे त्यांनी सांगितले.
दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
दिव्यांग मतदारांरीता प्रत्येक मतदान केंद्र इमारती ठिकाणी व्हीलचेअर आवश्यक प्रमाणात उपलब्‍ध आहेत. तसेच उन्हापासून संरक्षणाचे दृष्टीने शेड,पिण्याचे पाणी, मेडिकल किट उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन स्वयंसेवक तैनात ठेवण्यात येणार असून ते दिव्यांग मतदारांना व वयोवृद्ध मतदारांना मतदान कक्षात पोहोचण्यात सहकार्य करतील. जिल्‍हयातील सर्व १७०३ मतदान केंद्रावर आवश्‍यक सर्व मुलभुत सुविधा उपलब्‍ध असल्‍या बाबत सुनिश्चित करण्‍यात आले आहेत.दिव्‍यांग मतदारांनीही ते मतदान करणार असल्याबाबतचे शपथपत्र भरुन दिले आहे.ऑटो युनियनने मतदानाचे दिवशी दिव्यांग मतदारांना त्‍यांचे घरापासून मतदान केंद्रावर पोहाचविण्‍या करिता व परत आणण्‍या करिता मोफत ऑटोची व्‍यवस्‍था केली आहे.
पुरेसा बंदोबस्त
आतापर्यंत ४०७ परवानाधारकांची शस्त्र पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनामार्फत आवश्यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्यात आला असून संवेदनशील मतदान केंद्राचे ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या व केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या पाच जादा तुकड्यांची कुमक मागविण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
स्विप उपक्रमांद्वारे जनजागृती
मतदानाबाबत मतदारांमध्ये स्‍वी कार्यक्रमाचे माध्‍यमातून जनजागृती करण्यात येत असून कोणत्याही प्रचाराला किंवा आमिषाला बळी न पडता स्वतःच्या विवेकबुद्धीने मतदान करण्याबाबत मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी डिस्‍ट्रीक्‍ट ऑयकान नेमण्‍यात आले, आई बाबांना पत्र पाठवून शालेय विद्यार्थ्यांनी  मतदानाचा आग्रह करण्‍याचे पत्र पाठविण्यात आले, तसेच जिल्ह्यात अभिरुप मतदान असे कार्यक्रम घेऊन नव मतदारांमध्ये जागृती करण्यात आली, अशी माहिती स्विप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद
मतदानाचे दिवशी  ज्‍या ठिकाणी आठवडी बाजार भरतात त्‍या   ठिकाणी आठवडी बाजार बंद ठेवण्‍या बाबतचे आदेश निर्गमित करण्‍यात आले आहेत.
विशेष उपक्रम
जिल्‍हयात प्रत्‍येक विधानसभा मतदार संघात एक महिला मतदान केंद्र, एक आदर्श मतदान केंद्र व एक दिव्‍यांग व्‍दारा संचालित मतदान केंद्र  या प्रमाणे ५ महिला मतदान केंद्र, ५ आदर्श मतदान केंद्र व ५ दिव्‍यांग व्‍दारा संचालित मतदान केंद्र ठेवण्‍यात आले आहेत.
१७१ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग
मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील १७१ मतदान केंद्राचे वेब कास्‍टींग करण्‍यात येणार आहे. तसेच वेब कास्‍टींग मॉनिटरींग करण्‍याकरिता एक नियंत्रण कक्ष तयार करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक विधानसभा मतदान केंद्रावर सुक्ष्‍म निरीक्षक नेमण्‍यात आले आहेत.
वोटर हेल्पलाईन ॲप सुविधा
मतदारांच्‍या सोयी करिता व त्‍यांचे नाव मतदार यादीत शोधण्‍या करिता वोटर हेल्‍पलाईन अॅप्‍स तयार करण्‍यात आलेला आहे तसेच मतदारांना NVSP  Voter Search  या लिंकवरुन सुध्‍दा त्‍यांचे नाव मतदार यादीत असल्‍या बाबतची खात्री करुन घेता येईल. या व्‍यतिरीक्‍त टोल फ्री नंबर १९५० वर मतदानाचे दिवशी मोठयात प्रमाणात येणा-या दुरध्‍वनि कॉलची संख्‍या विचारात घेता त्‍या ठिकाणी १०  हॉन्‍टींग लाईन्‍स लावण्‍यात आल्‍या आहेत.
मतदान यंत्रांच्या वाहतुकीचे जी.पी.एस. द्वारे ट्रॅकिंग
मतदान यंत्राची ज्‍या वाहनातून वाहतुक करण्‍यात येणार आहे त्‍या वाहनावर जी पी एस ट्रॅकींग सिस्‍टीम बसविण्‍यात आलेले आहे.मतदाना साठीच्या ईव्‍हीएम विधानसभा मतदारसंघाच्या मुख्‍यालयी सुरक्षा कक्षात  ठेवण्‍यात आल्‍या असून  आयोगाने निर्देशित केलेल्‍या प्रमाणात पुरेशा पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.
मतदार चिठ्ठ्यांचे वाटप, दृष्टीहिनांसाठी ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठ्या
मतदारा करिता छापण्‍यात आलेल्‍या मतदार स्‍लीप (Voter Slip) चे ९९.२९  टक्‍के वाटप करण्‍यात आले असून उर्वरीत मतदार हे अनुपस्थित, स्थलांतरीत वा मयत असल्याने त्‍यांना मतदार चिठ्ठीचे वाटप करता आले नाही, असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे मतदाराकरिता छापलेल्या मतदार माहिती पुस्तिका (Voter Guide) सुद्धा वाटप केल्‍या आहेत. दृष्‍टीहीन मतदारांकरिता ब्रेल लिपीतील मतदार स्‍लीप वाटप पूर्ण करण्‍यात आले आहे.
मद्यविक्री बंद
कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित ठेवण्‍याचे दृष्‍टीने तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता मतदानाचे दिवशी सर्व दारु दुकाने बंद ठेवणे बाबत आदेश निर्गमित करण्‍यात आले आहेत.आता पर्यंत पोलीस विभाग व राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने केलेल्‍या कार्यवाहीत  २४६ प्रकणात  ७ लक्ष हजार १२२ रुपये रकमेच्‍या मुद्देमालासह २३५६ लीटर अवैध दारु जप्‍त करण्‍यात आली आहे. जिल्ह्यात भरारी पथकामार्फत तीन प्रकरणात ८ लाख १४ हजार ५१५ रुपये इतकी  रोख रक्‍कम जप्‍त करण्‍यात आली आहे.
आचारसंहिता उल्लंघनाचे सात गुन्हे नोंद
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागु झाल्‍या पासून आचारसंहिता उल्‍लंघना बाबतच्‍या  एकुण ७  गुन्ह्यांची नोंद करण्‍यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ