विषबाधा व्यवस्थापन;आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यशाळा; जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग



अकोला,दि.9(जिमाका)- पिकांवर फवारणी करतांना शेतकरी व शेतमजूरांना होणाऱ्या विषबाधांबाबत तात्काळ व योग्य वैद्यकीय उपचार  सेवा देण्यासाठी  जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. येथील नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस जिल्ह्यातील ६० हून अधिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे होते. यावेळी  अहमदाबाद येथील  शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तेजस प्रजापती हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, कृषि विस्तार अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या डॉ. आरती कुलवाल, ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टमचे  संतोष परांडे, गौरव भारसाकळे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना  तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील  वैद्यकीय अधिकारी यांना किटकनाशक फवारणी करतांना विषबाधीत झालेल्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. बाधीत होतेवेळी वापरलेले किटकनाशक व त्यानुसार करावयाचा औषधोपचार, उपचार पद्धती, उपचार पश्चात देखभाल आदींविषयी सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, किटकनाशक फवारतांना खबरदारी घेणे यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तथापि किटकनाशक फवारतांना विषबाधा होणे व त्यानंतर तातडीने करावयाच्या उपचारांबाबत  शेतकऱ्यांना मदत करणे ही सामुहिक जबाबदारी असून तात्काळ व योग्य उपचार देणे आवश्यक आहे. त्यासाठी या कार्यशाळेचे महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते  ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टम यांच्या वतीने जनजागृतीपर प्रचार रथास  हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ