कृषी विभाग व आत्मा यंत्रणा मार्फत किटकनाशके फवारणी बाबत जनजागृती




        अकोला,दि.03(जिमाका)-  पिकांवरील विविध किड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किटकनाशकाची फवारणी करण्यापुर्वी किडीच्या नुकसानाची  आर्थिक पातळी बघूनच फवारणीचे नियोजन व किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याबाबतची कार्यशाळा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)  व कृषी विभाग यांच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी सभागृह शिवर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळामध्ये किटकनाशक फवारणी करतांना किडींच्या नुकसानाचा प्रकार,प्रादुर्भावाची तीव्रता,आर्थ‍िक नुकसानीची पातळी, किडींच्या तोंडाची रचना आणि अवस्था यावरून किडीमुळे किती नुकसान झाले आहे आदिबाबतची माहिती देण्यात आली. किडीचा प्रार्दुभाव जास्त वाढला तर कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाच्या तज्ञांचा सल्ला घेणे, त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कीटकनाशकाची निवड करावी, शेतकऱ्यांनी किटकनाशके खरेदी करताना बिल घ्यावे तसेच लेबल क्लेम आणि शिफारस असलेले कीटकनाशक परवानाधारक विक्रेता कडुनच खरेदी करावे, फवारणी करीता आवश्यक त्या प्रमाणातच खरेदी करावीत, किटकनाशके खरेदी करताना माहिती पत्रकाची मागणी विक्रेताकडे करावी. माहिती पत्रकावरील सुचनांचे पालन करावे. त्यानंतर किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी सेप्टी किट परिधान करूनच फवारणी करावी.त्याचप्रमाणे आपल्या परीसरातील शेतकऱ्यांना संपूर्ण किट घालून फवारणी करीता प्रवूत्त करावे अशा प्रकारच्या सुचना प्रास्ताविकातून  तालुका कृषी अधिकारी आर.एम.फुलारी यांनी दिल्यात.
कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ विनोद सोनाळकर यांनी किटकनाशक फवारणीची दिशा शरीरापासून दुर ठेवावी, तसेच नेहमी वा-याच्या दिशेने फवारणी करावी. लेबल मधील दिशा निर्देश काळजी पुर्वक  वाचावे आणि त्याचे अनुसरण करावे. केंद्रीय किटकनाशक मंडळाने  शिफारस केलेली किटकनाशके फवारणी करावी. तणनाशक, बुरशीनाशक,रोगनाशक व इतर कोणतेही घटक शिफारस असल्याशिवाय मिसळून वापरु नयेत. तसेंच  शक्यतोतर दोन घटकांचे द्रावण फवारणीसाठी टाळलेच पाहिजे अशा प्रकारे मार्गदर्शन करून  उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकेचे निरसन केले तसेच महत्त्वाचा टिप्स दिल्या.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी आर.एम.फुलारी, आत्माचे  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यशाळेला मंडळ कृषी अधीकारी  ,कृषी  पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुक्यातील शेतकरी , कृषी मित्र  मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक नंदु वानखडे यांनी केले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :