अनाथ बालकांच्या प्रतिपालकत्वासाठी बाल संरक्षण कक्षाची हाक
अकोला,दि.16 (जिमाका)- जिल्ह्यातील अनाथ,निराधार मुलांच्या भावनिक परिपोषासाठी त्यांना समाजातील दानशूर व इच्छूक पालकांकडून
प्रतिपालकत्वासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ज्या बालकांना जैविक माता पिता
नसतील किंवा अन्य जवळचे नातेवाईकही नसतील अशांचे प्रतिपालकत्व घेण्यासाठी इच्छूक
प्रतिपालकांनी जिल्हा बालसंरक्षण कक्ष
यांचेकडे अर्ज करावा, अशी हाक जिल्हा बालसंरक्षण कक्षाने दिली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बालकाच्या
मुलभुत हक्काच्या संरक्षणासाठी आपल्या देशात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )
अधिनियम 2000 ची निर्मिती झाली. कायदा अंमलबजावणी
करताना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींना बघुन
कायद्यामध्ये बदलही करण्यात आले. सद्यस्थितीत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण
) अधिनियम 2015 या कायद्याप्रमाणे देशात
बाल हक्क संरक्षणाचे सर्वोत्तम हित
महत्त्वपुर्ण मानले आहे. याच
बाबीचा विचार करून कोणतेही लहान मुल हे ‘अनाथ’
असु नये यावर भर देण्यात आला. यासाठी देशात
प्रत्येक बालकाला कुटूंब परिवार
मिळाला पाहिजे यासाठी शासन आग्रही आहे. कारण
बालकाला सुजान , सुदृढ नागरिक बनायच असेल तर त्याला त्याचे बालपण सुदृढ , चांगले असावे यावर कायद्याचा विश्वास आहे. आपल्या देशात असंख्य बालके असे आहेत
की, ज्यांना रस्त्यावर असुरक्षित राहावे
लागते. त्यांना आई, वडील किंवा जवळचे
नातेवाईक नाहीत अशी बालके कुठेतरी भिक मागतात किंवा त्यांचा कोणीतरी
गैरवापर करू शकतो. नाही तर ते
एखाद्या संस्थेमध्ये प्रवेशित करण्यात
येतात आणि तिथेच वयाची 18
वर्षापर्यंत राहतात. पण
भावनिकदृष्ट्या विचार केल्यास
त्या बालकांनासुद्धा कुटूंबाची गरज भासते. आपल्या देशात असंख्य
बालके असे आहेत की, ज्यांना रस्त्यावर असुरक्षित जागी राहावे लागते. ज्यांना
आई-वडिल किंवा जवळचे कोणीही नातेवाईक नाही. अशा बालकांना एकतर असेच
कुठेतरी कुढत रखडत जगावे लागते किंवा
शासनाच्या कोणत्याही बालगृहात राहावे लागते. परंतु प्रत्येक बालकाला घराची
ओढ असते. सन 2016 -17 मध्ये
बालकांच्या भावनिक व त्यांची
होणारी वाढ या विषयावर केलेल्या
अभ्यासामध्ये अशा परिवारापासुन दुर राहणाऱ्या बालकांना
कुटूंबाची गरज असते असे निर्दशनास
आले आहे.
दि. 19 जुन 2019 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे काढण्यात आलेल्या शासन
निर्णयामुळे अशा बालकांना कुटूंब
कसे देता येईल. यावर प्रामुख्याने भर देण्याचा विचार करण्यात आला आहे. यालाच प्रतिपालकत्व (फॉस्टर
केअर) असे म्हणतात. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015
च्या कलम 44 नुसार बालकाला जर जैविक माता-पिता नसेल किंवा कोणीही जवळचे
नातेवाईक नसेल तर या मुलांना प्रतिपालकत्व मिळावे असे नमुद आहे. यानुसार
प्रत्येक अनाथ /काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक , विधीसंघर्षग्रस्त बालक हे
प्रतिपालकत्वासाठी पात्र असतील.
प्रतिपालकत्वासाठी इच्छुक पालकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला कडे
अर्ज सादर करावयाचा आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी, सामाजिक
कार्यकर्ता यांच्या माध्यमातून त्यांची भेट
घेतली जाईल. त्यावेळी त्या परिवाराचा सामाजिक अन्वेषण अहवाल तयार केला जाईल व त्या अहवालाच्या आधारे
बाल कल्याण समिती यांना प्रतिपालकत्व
कुटूंबाची यादी सादर करण्यात येईल. त्यानंतर बाल कल्याण समितीकडून संबधित बाबत
आदेश निर्गमित करण्यात येईल. जर हे झाले तर आपल्या कोणत्याही बालकाला
कुटूंबाशिवाय रहावे लागणार नाही. समाजातील या मुलांना पैशाची किंवा वस्तुच्या मदतीसोबतच भावनात्मक आधाराची,
प्रेमाची , आपुलकीची तसेच
आपले म्हणण्याची गरज आहे. आणि हाच आधार आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी इच्छूक प्रतिपालकांनी जिल्हा
बाल संरक्षण कक्षात अर्ज सादर करावा,असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी करुणा
महंतारे यांनी केले आहे. संपर्कः जिल्हा बालसंरक्षण कक्ष, अकोला, द्वारा चवरे
प्लॉट, सरस्वती साडी शॉप च्या बाजूची गल्ली, शास्त्री स्टेडियम समोर, टॉवर चौक,
अकोला.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा