दिव्यांग मतदारांचे १०० टक्के मतदान करण्याचे नियोजन-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


ऑटोरिक्षा संघटना देणार मोफत सेवा
        अकोला,दि.२६(जिमाका)- विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी निवडणूक यंत्रणेने नियोजन केले असून  हे नियोजन पूर्णत्वास जाऊन दिव्यांग मतदारांच्या मतदानाची टक्केवारी १०० टक्के साध्य करण्यासाठी दिव्यांग संघटनांनी व समाजातील अन्य घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
            विधानसभा निवडणूकीत नोंदणी झालेल्या सर्व दिव्यांग मतदारांचे मतदान होण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी  निवडणूक उपजिल्हाधिकारी  राजेश खवले, प्रकाश अंधारे, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी प्रकाश अवचार, निरंजन इंगळे, नंदिती दामोदर, संजय बरेड तसेच  ऑटो रिक्षा चालक व श्रमिक कामगार संघटनेचे संतोष शर्मातसेच दिव्यांग आर्ट गॅलरी, नॅशनल असो. फॉर दी ब्लाईंड, महाराष्ट्र राज्य  अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना,  राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, परिस संस्था, साथ फाऊंडेशन आदी संघटना व संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
            जिल्ह्यात सध्या १३ हजार ७०२ दिव्यांग मतदार नोंदविण्यात आले आहेत.  त्यात अकोला तालुक्यात ५४९९, अकोट तालुक्यात १९४९, तेल्हारा तालुक्यात १२२५, बाळापूर तालुक्यात १६६८, पातूर तालुक्यात ९६८, मुर्तिजापूर तालुक्यात १२१७ तर बार्शीटाकळी तालुक्यात ११७६ मतदार आहेत.                    
            या निवडणूकीत ऑटोरिक्षा संघटना दिव्यांग मतदारांची ने आण करण्यासाठी मोफत १०० रिक्षा उपलब्ध करुन सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले.  दिव्यांग संघटनांनी बुथ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिव्यांग मतदारांची नोंद घेऊन मतदार यादीत त्यांचे नाव निर्देशित करुन घ्यावे, जेणे करुन मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना संपर्क करुन  त्यांना सेवा देणे शक्य होईल असे, जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.  या शिवाय  दिव्यांगांमध्ये मतदानाबाबत व मतदान करता यावे यासाठी करण्यात आलेल्या सोई सुविधांबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील ऑटो रिक्षा विविध सामाजिक संस्था, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि निवडणूक यंत्रणा सगळ्यांनी मिळून सर्व दिव्यांग मतदारांचे मतदान होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :