‘एक दिवस दिव्यांग मतदारांसाठी’; रिक्षाचालकांचा पुढाकार
मतदानासाठी दिव्यांगांना विनामूल्य सेवा
दिव्यांग मतदारांना आवश्यक सर्व सुविधा
द्या- आयुक्त पियुष सिंह
अकोला,दि.27(जिमाका)-विधानसभा निवडणूकीसाठी
दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी येणाऱ्या सर्व संभाव्य अडचणी लक्षात घेऊन
त्यांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करुन द्या. तसेच एकही दिव्यांग मतदार मतदानापासून
वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह
यांनी आज जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले.
दरम्यान आज अकोला जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेने मतदानाच्या दिवशी दिव्यांग
मतदारांची विनामूल्य ने आण करण्याचा
संकल्प केला. एक दिवस दिव्यांग मतदारांसाठी हे घोषवाक्य घेऊन रिक्षाचालक हे कार्य
सेवाभावी वृत्तीने करणार आहेत. विभागीय आयुक्त सिंह यांनी रिक्षाचालकांच्या या
पुढाकाराचे स्वागत केले. यावेळी आयुक्त सिंह यांच्या हस्ते रिक्षांवर स्टिकर्स
लावून जनजागृती उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला.
आज जिल्हा नियोजन
सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी
राम लठाड, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, गजानन सुरंजे, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्रकाश अंधारे, दिव्यांग संघटनांचे
प्रतिनिधी प्रकाश अवचार, निरंजन इंगळे, नंदिती दामोदर, संजय बरेड तसेच ऑटो रिक्षा चालक व श्रमिक कामगार संघटनेचे
संतोष शर्मातसेच दिव्यांग आर्ट गॅलरी, नॅशनल असो. फॉर दी ब्लाईंड, महाराष्ट्र
राज्य अपंग कर्मचारी व अधिकारी
संघटना, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ,
परिस संस्था, साथ फाऊंडेशन आदी संघटना व संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित
होते.
दिव्यांग आयकॉन विशाल कोरडे यांनी व
त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान गीत सादर केले. त्यानंतर विविध दिव्यांग संघटनांनी
त्यांच्या संघटनेमार्फत राबवावयाच्या दिव्यांग मतदार जनजागृती उपक्रमांची माहिती
दिली. त्यानंतर उपस्थित रिक्षाचालकांनी एक
दिवस दिव्यांग मतदारांसाठी या विनामूल्य सेवेची घोषणा केली.
आपल्या मार्गदर्शनात विभागीय आयुक्त
सिंह यांनी रिक्षाचालकांनी दिलेल्या सहकार्याचे कौतूक केले. दिव्यांगांचे मतदान १०० टक्के व्हावे यासाठी
अधिकाधिक जनजागृती व सुविधा पूर्तता करण्यावर भर द्या, असे त्यांनी सांगितले.
दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअर, घर ते मतदान केंद्र व पुन्हा मतदान केंद्र ते घर
अशी विनामूल्य वाहतुक सेवा, मतदान केंद्रांवर रॅम्प्स, मदनीसांची उपलब्धता,
बसण्याची व्यवस्था इ. सुविधा उपलब्ध करा अशा सुचना दिल्या.
अधिकाऱ्यांची आढावा बैठक
यावेळी सर्व अधिकाऱ्यांचा आढावा
घेण्यात आला. त्यात विभागीय आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांनी दिव्यांग मतदारांची
मतदार यादीतील ओळख पटवणे, त्यानुसार त्यांना नेण्यासाठी वाहन सुविधा व मदतनीस
उपलब्ध करुन देणे. मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधांची खातरजमा करणे याबाबत
प्राधान्याने पूर्तता करावी, असे निर्देश दिले.
या
सभेचे आभार प्रदर्शन निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी तर सूत्रसंचालन
प्रकाश अंधारे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा