विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा


अकोला,दि.11(जिमाका)- आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणेचा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत मतदार नोंदणी ते कायदा सुव्यवस्था अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले,  निवासी उपजिल्हाधिकारी राम खटोड,  सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी, नव मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, मयत, स्थानांतरीत मतदारांची नावे वगळणे, दुबार नावे वगळणे याबाबत आढावा घेतला. तसेच मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सर्व सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी द्यावयाच्या सुविधा,   मतदार जनजागृती उपक्रम, कायदा सुव्यवस्था,  प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान यंत्रांची सुरक्षा व्यवस्था आदी सर्व व्यवस्थांबाबत आढावा घेतला.  जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याबाबतही त्यांनी सुचित केले.
सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण
जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय नेमण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षणही आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. निवडणूक काळात आचारसंहिता पालनाबाबत घ्यावयाची दक्षता, आचारसंहिता भंगाची प्रकरणे हाताळणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ