मतदार जनजागृतीसाठी अभिरूप मतदान: सुदृढ लोकशाहीसाठी मतदानात सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


        अकोला,दि.२५(जिमाका)- निवडणूक हा  लोकशाहीतील महोत्सव असून प्रत्येक मतदारांने आपला मतदानाचा हक्क  बजावला पाहिजे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
        विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी आज शाळा महाविद्यालयात अभिरुप मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा प्रारंभ शिवाजी महाविद्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, शिक्षणाधिकारी  प्रकाश मुकूंद यांची प्रमुख उपस्थिती  होती.
            महाविद्यालयींन विद्यार्थ्यांनी मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे अभिरूप मतदान यावेळी  घेण्यात आले. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजीत कार्यक्रमात  जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. 
            यावेळी बोलतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी  विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेवून  जिल्ह्यातील दिव्यांग, जेष्ठ नागरीक व गर्भवती स्त्रियांना मतदान करण्यासाठी मदतनीस म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.  येत्या विधानसभेत  विद्यार्थ्यांनी स्वत: मतदान करावे व परिसरातील इतरांना मतदान करण्यासाठी जागृत करावे,असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. यावेळी मतदान  करण्याबाबत  उपस्थितांना  शपथ देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना मतदान केंद्राचा अनुभव, मतदान यादीत नाव शोधणे, मतदार यादी पाहणे, मतदान कार्ड किंवा मतदानासाठी इतर सांगितलेल्या ओळख म्हणून वापरल्या जाणाऱ्या कागद पत्रे आणि प्रत्यक्ष संपूर्ण मतदान प्रक्रियांमध्ये भाग  घेण्याचा प्रत्यक्ष अनुभव तज्ज्ञांच्या  उपस्थितीत देण्यात आला.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  राष्ट्रीय सेवा योजनेचे  जिल्हा समन्वयक संजय तिडके यांनी तर आभार प्रदर्शन  शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी केले. यावेळी   शिवाजी महाविद्यालयाचे अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी,विद्यार्थींनी मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :