निवडणूक कालावधीकरीता प्रतिबंधात्मक आदेश
अकोला,दि.२५(जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
२०१९ चा कार्यक्रम घोषित झाला
असुन आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
चे कलम १४४ अंतर्गत निवडणूक कालावधी करीता जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहेत.
या आदेशान्वये खालील
बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यात शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेणे,
शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्रामगृह परिसरात सभा,बैठक घेण्यास राजकीय कामासाठी
वापर, घोषणा देणे, रॅली काढणे, निवडणूक कामात बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे, शासकीय,
निमशासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विद्रुपिकरण करणे, उमेदवार, त्याचे हितचिंतक,
मुद्रणालयाचे मालक यांनी नमुना मतपत्रिका छापणे, खाजगी जागा मालकाच्या परवानगी
शिवाय तेथे प्रचारासाठी झेंडे, बॅनर, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे, रात्री
उशीरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालविणे,
धार्मिक, जात, भाषा मेळाव्यांचे आयोजन, नामनिर्देशन दाखल करते वेळी निवडणूक निर्णय
अधिकारी यांच्या कार्यालयात तीन पेक्षा अधिक वाहने आणणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
दालनात पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींचा प्रवेश यास प्रतिबंध करण्यात आला
आहे. तसेच मतदान केंद्र,मतमोजणी केंद्र व निवडणूक
साहित्य कक्ष असणाऱ्या ठिकाणी २०० मिटर परिसरात
प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
मतदान पूर्ण होण्याच्या वेळेच्या ४८ तास आधीपासूनच्या कालावधीत जाहीर सभा, मिरवणूक घेण्यास, चलचित्र, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोणतीही बाब प्रदर्शित करण्यास, जनतेचे लक्ष
वेधून घेण्यासाठी संगीत सभा, नाट्यप्रयोग, करमणूकीचा, मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित
करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबींचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही
देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा