क्षयरोग निर्मुलनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला,दि.03(जिमाका)- केंद्र शासनाने
2025 पर्यंत देशात क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यामुळे
क्षयरोग नियंत्रणासाठी लोकांकडून त्वरीत व
योग्य प्रतिसाद मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी समाजात क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
संबंधीत यंत्रणेला दिलेत.
जिल्हाधिकारी यांच्या
कक्षात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टीबी फोरमच्या सभेचे
आयोजन करण्यात आले होते. या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , सहाय्यक संचालक कुष्ठरोग
डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी
डॉ. मेघा गोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी तुळशीराम काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मोरे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
एमडीआर टीबी व
एचआयव्ही बाधीत रूग्ण अंत्योदय लाभापासुन
वंचित राहणार नाही याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी यासाठी आरोग्य विभागाकडून त्यांना यादी पुरविण्यात यावी अशा सुचना
जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधीत विभागाला दिल्यात. जिल्ह्यातील औषध विक्रेत्या
दुकानदारांनी क्षयरोग प्रतिबंधक औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा
यासाठी अन्न व औषध विभागाने जास्तीत जास्त
लक्ष ठेवावे. खासगी वैद्यकीय रूग्णांलयात येणा-या प्रत्येक क्षयरोगाच्या रुग्णांची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी
दिलेत. समाजातील क्षयरोग रुग्णांना शासनाच्याय सर्व सोयी-सुविधा बाबत माहिती दयावी
तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेवून आरोग्य विषयक सेवा व सुविधा त्यांना पुरविण्यात याव्यात यामुळे
क्षयरोगी लवकर बरा होईल अशा सुचना
जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्यात.यावेळी जिल्हा
टीबी फोरमचे सदस्य तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा