विधानसभा निवडणूक २०१९: ३६ हजार नवतरुण मतदार बजावणार मतदानाचा हक्क


अकोला, दि.२४ (जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये जिल्ह्यात मतदानाचा हक्क तब्बल १५ लाख ७७ हजार २५४ मतदार बजावणार आहेत. या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक यंत्रणेने  तब्बल १७०३ मतदान केंद्र आहेत. या निवडणूकीत तब्बल ३६ हजार २८८ नवतरुण मतदार (१८ ते १९ वर्षे वयोगटातील आपला मतदानाचा हक्क बजावतील. तथापि सर्वाधिक मतदार हे ३० ते ३९ या वयोगटातील म्हणजेच तीन लाख ६७ हजार २८४ इतके आहेत.
अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत.  याच पाचही विधानसभा मतदारसंघ मिळून  जिल्ह्यात एकूण १५ लाख ७७ हजार २५४ इतकी मतदार संख्या आहे. ही मतदार संख्या ही ३१ ऑगस्ट २०१९ अखेर पर्यंतची आहे.  त्यात एकूण आठ लाख १२ हजार १८१ पुरुष तर ७ लाख ६१ हजार ८६४ महिला, ४६ इतर मतदार आहेत. शिवाय ३१६३ सेवा मतदार आहेत. त्यात ३१०० पुरुष तर ६३ महिला सेवा मतदारांचा समावेश आहे. असे एकूण १५ लाख ७७ हजार २५४ मतदार संख्या आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या या प्रमाणे-
२८- अकोट- एकूण दोन लाख ८४ हजार ८४३ , पुरुष एक लाख ५० हजार ६०४ , महिला एक लाख ३४ हजार २३४, इतर पाच, सेवा मतदार ७४६.
२९- बाळापूर- एकूण दोन लाख ९४ हजार ४८६, पुरुष एक लाख ५३ हजार ४२५, महिला एक लाख  ४१ हजार ६१, सेवा मतदार ४११.
३०- अकोला पश्चिम- एकूण तीन लाख ३१ हजार ४५६, पुरुष एक लाख ६८ हजार २९७, महिला एक लाख ६२ हजार ८४८, इतर १६  तर सेवा मतदार २९५.
३१- अकोला पूर्व- एकूण तीन लाख ४४ हजार १५. पुरुष एक लाख ७६ हजार २१८, महिला एक लाख ६७ हजार २०५, इतर १८ , सेवा मतदार  ५७४.
३२- मुर्तिजापूर- एकूण ३ लाख २० हजार ७८३. पुरुष- एक लाख ६३ हजार ६३७, महिला एक लाख ५६ हजार ५१६, इतर ७ व सेवा मतदार ६२३.
मतदान केंद्रः-
या सर्व मतदारांना मतदानासाठी एकूण १७०३ मतदान केंद्र असतील. ती विधानसभा मतदारसंघ निहाय याप्रमाणे-  अकोट-३३१, बाळापूर-३३६, अकोला पश्चिम ३००, अकोला पूर्व ३५०, मुर्तिजापूर ३८६, असे एकूण १७०३ मतदान केंद्र आहेत.
वयोगटानुसार मतदार संख्या- १८ ते १९ वर्षे वयोगटातील  एकूण ३६ हजार २८८ मतदार आहेत. तर २० ते २९ वर्षे या वयोगटातील तीन लाख १६ हजार ३७०, ३० ते ३९ वर्षे वयोगटातील तीन लाख ६७ हजार २८४, ४० ते ४९ वर्षे वयोगटातील तीन लाख २९ हजार ५५९, ५० ते ५९ वर्षे वयोगटातील  दोन लाख ४२ हजार १०३, ६० ते ६९ वयोगटातील  एक लाख ४९ हजार ९०५, ७० ते ७९ वयोगटातील ८१ हजार ७७९ तर ८० व त्याहून अधिक वयाचे ५० हजार ८०३  मतदार आहेत. एकूण मतदार संख्येचे प्रमाण पाहता ३० ते ३९ वर्षे या वयोगटातील  मतदारांची संख़्या सर्वाधिक आहे. हे प्रत्यक्ष नोंदणी होऊन झालेल्या मतदारांची संख्या आहे. यात सेवा मतदारांचा समावेश नाही.
मतदार नोंदणी प्रक्रिया-
मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी नवीन नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा लागतो. अनिवासी भारतीय असल्यास त्यास फॉर्म क्रमांक ६ अ भरुन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येते. या शिवाय एखादा मतदार मयत झाल्यास,  त्याने स्थलांतर केल्यास वा दोन ठिकाणी नाव असल्याचे निदर्शनास आल्यास मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी  फॉर्म क्रमांक ७ भरुन नाव वगळता येते.  नावात बदल वा दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी फॉर्म ८ भरुन दुरुस्ती करता येते. तर पत्ता बदलला असल्यास फॉर्म ८- अ भरुन दुरुस्ती करता येते. विधानसभा निवडणूक २०१९ साठी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले व ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत नाव नोंदणी  केलेल्या मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. तर सध्याच्या जाहीर झालेल्या निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. तथापि मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर सुरु असते.
सेवा मतदार- विविध सैन्य दलात व अर्धसैनिक दलात कर्तव्य बजावणारे जवान आपल्या मुळ रहिवासाच्या ठिकाणी मतदानाचा हक्क सेवा मतदार म्हणून बजावतात. त्यांना सर्व्हिस व्होटर्स असे संबोधले जाते. त्यासाठी मतदार हा आपल्या तुकडीच्या प्रमुखांकडे अर्ज करतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन  त्याची स्विकृती ही जिल्हा निवडणूक कार्यालयात होते. त्यानुसार यादी तयार होते.
हे मतदार टपाली मतदान पद्धतीने मतदान करु शकतात. त्यासाठी ETPBS  (Electronically Transfer Postal Ballate System) प्रणालीचा वापर होतो. त्यासाठी सैन्यदलातील युनिटवर मतपत्रिका प्रिंट दिली जाते. ही प्रक्रिया ऑनलाईन होते. ओळख पडताळणीसाठी बारकोडचा वापर केला जातो. मतदार आपले मतदान नोंदवून पोष्टाद्वारे पाठवतात. या शिवाय जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असतात त्यांनाही आपले मतदान टपाली पद्धतीने करण्याची सुविधा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :