‘प्रधानमंत्री कुसुम-ब योजना’ :कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरणासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध

 



अकोला, दि.२६(जिमाका)- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत कृषीपंपांना सौरऊर्जेवर आधारित विद्युतीकरण देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अर्ज करावे,असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

                                             अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी शासनाने वेळोवेळी  प्रोत्साहन दिले आहे.  त्याअंतर्गतच शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्या सौर उर्जेवर करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबविल्या जात आहेत.  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला  अर्थात प्रधानमंत्री कुसुम  योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख या प्रमाणे सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध आहेत. सौर कृषीपंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट हे प्रथम येणाऱ्यास प्रथम या प्राधान्य तत्त्वावर पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी महाउर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.  दि.१७ मे पासून नवीन अर्ज स्विकारणे सुरु झाले आहे.

                                             त्यासाठी शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या लिंकवर जाऊन अर्ज करावा. योजनेची सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती याबाबत www.mahaurja.com या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. बनावट संकेतस्थळाचा वापर करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत २७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. महाउर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करतांना अडचणी आल्यास ०२०-३५०००४५६/०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ