जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेखः- तंबाखू सेवनः सोडवा व्यसन; फुलवा जीवन

  


तंबाखु सेवनामुळे अनेक शारिरीक आणि आर्थिक हानी होतात. तंबाखूसेवनामुळे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे ‘तंबाखू सेवनाचे व्यसन सोडवा आणि आपले अमूल्य असे जीवन फुलवा’, हा संदेश जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून देणे आवश्यक आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिन (WNTD) (दि.३१ मे) हा तंबाखू सेवनाच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी प्रभावी धोरणांचा पुरस्कार करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो.  जागतिक आरोग्य संघटने (World Health Organization) च्या मते, तंबाखू पिकवण्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच जमिनीचे आरोग्य पणाला लागते. तंबाखू उद्योगामुळे तंबाखू लागवडीला चालना दिली जाते, परिणामी अन्नधान्य पिकांची लागवड कमी होते आणि जागतिक अन्न संकटे निर्माण होऊ शकतात. जागतिक तंबाखू विरोधी दिन या सर्व मुद्यांवर  जनजागृती करुन शेतकऱ्यांना शाश्वत अन्न-धान्य पिकवण्यास आणि अन्न सुरक्षा व पोषण गुणवत्ता सुधारण्याबाबत प्रेरणा देईल.

 

जागतिक तंबाखू विरोधी दिनाची पार्श्वभुमि

 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सन १९८७ मध्ये तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि आरोग्यावरील घातक परिणामांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पहिला जागतिक तंबाखू विरोधी दिन ‘तंबाखू किंवा आरोग्य निवडा’ या  थीमसह साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस तंबाखू नियंत्रणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करतो. तंबाखूच्या वापराच्या विविध पैलूंबद्दल आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एक थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी त्याची थीम आहे ‘आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही’.

तंबाखू सेवन आणि मानवी आरोग्य

गेल्या काही वर्षांपासून, जागतिक तंबाखू विरोधी दिनामुळे अनेक विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये तंबाखूच्या जाहिराती, दुय्यम धूर, तंबाखू कर आकारणी, तंबाखू उद्योग हस्तक्षेप, तंबाखूचे पॅकेजिंग आणि युवक प्रतिबंध यांचा समावेश आहे. जागतिक आकडेवारीनुसार, तंबाखूमुळे दर ८ सेकंदाला ‘एक’ मृत्यू घडतो. भारतात, तंबाखू संबंधित मृत्‍युची एकूण संख्या दरवर्षी ८ ते ९ लाख इतकी आहे. तंबाखूपासून दूर राहिल्यास एका युवक-युवतीचा जीवनकाळ २० वर्षाने वाढू शकेल.

कॅन्सरचे प्रमुख कारण तंबाखू सेवन

तंबाखू सेवनाने (कोणत्याही स्वरुपात) तोंडाचा, ओठाचा, जबड्याच्या, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी रोग होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे.

भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे. भारतात ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. भारतात ८२ % फुफ्फुसाच्‍या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान हे आहे.

तंबाखू सेवनाने क्षयरोग, हृदयरोग, उच्च रक्तदाबाचा धोका

            तंबाखू हे क्षयरोग होण्‍याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान कर णाऱ्यांमध्ये देखील टीबी, तिप्पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बिड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते. धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते. यामुळे पायाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गॅंगरीन होऊ शकते. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्‍यांच्‍या पापुद्र्याला नुकसान पोहोचवते. मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्‍या इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो, हे लघवीच्या निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करता आढळून आले. तंबाखू किंवा धुम्रपानामुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त बळावते. तंबाखूमुळे रक्तातील चांगले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. धूम्रपान करणारे/तंबाखू सेवन करणारे यांच्यात, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका २ ते ३ पट अधिक वाढतो. 

तंबाखू सेवन नपुंसकतेचे कारण

धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात. याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे. धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते. धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.

तंबाखू सोडा निरोगी आयुष्य जगा

तंबाखू सेवन बंद केल्यास आरोग्यावर लगेचच चांगले परिणाम दिसून येतात. तंबाखू सेवन सोडून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. तंबाखू सेवन बंद केल्यास कॅन्सर वा हदयरोग होण्याचा धोका कमी होतो. हृदयावर येणारा दाब कमी होतो. धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास आपल्या भवतालच्या लोकांना होणार नाही. धूम्रपानामुळे होणारा खोकला (सारखा होणारा खोकला व कफ) नाहीसा होईल. तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.

सामाजिक फायदे

तुम्ही स्वतः नियंत्रक व्हाल, सिगारेट तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही. तुमची आत्‍म-शक्ती तथा आत्मविश्वास वाढेल. आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक (पिता/माता) बनाल. तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.

तंबाखू सेवन थांबवायचेय….?हे उपाय करा!

जे नजरेसमोर नसते ते आठवत नाही. त्यामुळे सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा वस्तू सहज उपलब्ध होतील अशा जागी ठेवू नका.धूम्रपान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कारणांना ओळखा व अशा कारणांना टाळा वा अन्य पर्याय शोधा.

मित्र मंडळी किंवा गट, सिगारेटी, तंबाखू खातो कां? असे असल्यास त्यांची संगत टाळण्याचा प्रयत्न करा किंवा ते जेव्हा, सिगारेट, तंबाखू सेवन करत असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा. तोंडात च्‍युइंगम, चॉकलेट, पे‍परमिंट इ. ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक प्याला पाणी प्या. व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखुमुळे होणाऱ्या भयंकर रोगांचा विचार करा. सेवन थांबवण्याची एक तारीख ठरवा. जवळच्या व्यक्तिची मदत घ्या. तुमचे वेळापत्रक सिगरेट, तंबाखू सोडून आखा.

जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा. दोन सिगारेट ओढण्यामध्ये कालावधी वाढवत न्या  आणि सिगारेट ओढणे क्रमशः बंद करा. दीर्घ श्वास घ्या. पाणी प्या. स्‍वतःसाठी सकारात्मक बोला. स्वतःला पुरस्कृत करा. दररोज व्यायामाच्या तंत्रांचा वापर करा जसे (योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी). सक्रिय बना आणि पोषक आहार घ्या. नियमित व्यायाम करा. निरोगी व स्वस्थ जीवन जगा!

-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ