तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा 2023-24 बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा- आ.रणधीर सावरकर

 








अकोला,दि.15(जिमाका)-  शेजारील राज्यातून खोटे बीटी बियाणे विक्रीसाठी येण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दक्ष राहावे. अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत दिले. 

अकोला तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेस पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, जि.प. सदस्य गोपाल  दातकर,  श्रीमती किरण शिवा  मोहोड, पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी शशिकांत जांभुरुणकर, तहसिलदार सुनिल पाटील, तसेच सर्व मंडळ अधिकारी, कृषिसेवक आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी जांभुरुणकर यांनी तालुका खरीप हंगाम पूर्व तयारी आढाव्याचे सादरीकरण केले. त्यात दिलेल्या माहितीनुसार,

खरीप पेरणीचे नियोजन- अकोला तालुक्यात  एकूण 92 हजार 288 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. पिकनिहाय क्षेत्र व अपेक्षित उत्पादन याप्रमाणे-  सोयाबीन 40 हजार 350 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असून 1 हजार 682 किलो/हेक्टर  उत्पादन अपेक्षित आहे. कापूस 30 हजार हेक्टरमध्ये 1 हजार 120 किलो/हेक्टर, तूर 11 हजार 308 हेक्टरमध्ये 874 किलो/हेक्टर, मूग 1 हजार 150 हेक्टरमध्ये 211 किलो/हेक्टर, उडीद 700 हेक्टरमध्ये 386 किलो/हेक्टर, तुर 11 हजार 308 हेक्टरमध्ये  874 किलो/हेक्टर याप्रमाणे लागवड क्षेत्र व उत्पादन अपेक्षित आहे.

आमदार रणधीर सावरकर यांनी निर्देश दिले की, ज्वारी उत्पादन क्षेत्र वाढवण्याचे आवश्यक असून याकरिता शेतकरीबांधवाना प्रोत्साहित करावे. याकामी कृषिसेवकांना लक्षांक निर्धारित करुन द्यावे. मागील हंगामात तुरीवर कीड प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होऊन तुर पिकांचे नुकसान झाले होते. हे बाब लक्षात घेऊन हंगामापूर्वी तयारी करावी.  कीड प्रार्दुभाव कमी करण्यासाठी नॅनो युरिया अत्यंत प्रभावी आहे. याचा प्रचार व प्रसार करुन त्याचे फायदे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावे. खरीप हंगामाकरिता प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल याची खातरजमा करावी. बाहेर राज्यातून येणारी बोगस बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा बियाण्याची विक्री करणाऱ्या निविष्ठाधारकांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश दिले.

जलयुक्त शिवारअंतर्गत अकोला तालुक्यातील निवड झालेल्या गावातील शेततळ्यांचे  कामे प्राधान्याने हाती घेऊन ते पूर्ण करा. या योजनेतील नाले, जलाशय यात तयार झालेल्या गाळ काढण्याचीही कामे पूर्ण करा.  मागील वर्षातील पिक विमासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा. तसेच आंतरराष्ट्रीय कडधान्य मोहिमेअंतर्गत राबविलेल्या मोहिमेची सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी आमदार सावरकर यांनी दिले. शेतकरी बांधवानी घरचे बियाणे वापरावे याकरिता प्रोत्साहित करावे. याकरिता शेतकऱ्यांना उगवण क्षमतासंदर्भात कृषीसेवकांनी मार्गदर्शन करावे. कृषी विभागाने याकामी निःस्वार्थ व पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश यावेळी दिले.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ