मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक: आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 






अकोला,दि.१६(जिमाका)- मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक आहे. वेळेवर संपर्क स्थापित करुन आपण प्रतिसाद देऊ शकतो, त्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष व सज्ज रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.

सन २०२३ च्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात घेण्यात आला. जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप साबळे तसेच सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात चार उपविभाग, सात तालुके, ९९१ गावे, ५३० ग्रामपंचायती, एक महानगरपालिका, पाच नगरपालिका व एक नगरपंचायत आहे.यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ६९३.७ मि.मी इतके पर्जन्यमान होईल असे अनुमान आहे.जिल्ह्यात दोन मोठे, ३ मध्यम, ३३ लघु प्रकल्प आहेत.

पुराचा धोका असणारी गावे

जिल्ह्यात एकूण ७७ गावे पुराचा धोका असणारी आहेत. त्यात अकोला तालुक्यातील १३ गावे- अकोला, म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु., कुरणखेड. बार्शीटाकळी तालुक्यात १२ गावे- चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सुकळी, वरखेड, सिंदखेड. अकोट तालुक्यात १० गावे- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरुर. तेल्हारा तालुक्यात ११ गावे- मन्नात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद, दानापूर, सौदळा, वारखेड. बाळापूर तालुक्यात आठ गावे- वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण. पातुर तालुक्यात १० गावे- पास्टूल, भंडारज खु., आगीखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा. मुर्तिजापूर तालुक्यात १४ गावे-  हेंडज, पिंगळा, कोळसराभटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही, उनखेड.

अकोला शहरात  खडकी, चांदुर, अष्टविनायक नगर, म्हाडा कॉलनी, ड्रिमलॅण्ड सिटी, कौलखेड, प्राजक्ता शाळेच्या मागील भाग, मातोश्री नगर, एमराल्ड कॉलनी, गंगानगर, गीतानगर, होलसेल किराणा मार्केट, जाजूनगर, शिवसेना वसाहत, बाळापूर नाका, निमवाडी परिसर, रेणूका नगर, गोडबोले प्लॉट, तारफैल, विजयनगर, विठ्ठल नगर, लहान उमरी, सावंतवाडी, अशोकनगर.

यंत्रणांनी करावयाची कार्यवाही-

कार्यकारी अभियंता पाटबंधारे यांनी प्रकल्पांवर २४ तासासाठी सहायक अभियंता व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पावसाळ्यापूर्वी  मोठे, मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करावी तसेच दरवाजांची दुरुस्ती करावी.  दोन मोठ्या प्रकल्पांत बिनतारी संदेश यंत्रणा स्थापित करावी. अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांतून होणाऱ्या विसर्गामुळे पूर्णा नदीला पूर येतो. त्याचे व्यवस्थापन करणे.

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी तालुकास्तरावर तसेच ग्रामस्तरावर  पूरनियंत्रण समितीच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात यावा. नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापनात वापरावयाची बचाव साहित्ये त्यांची दुरुस्ती आदी कामे पूर्ण करुन घ्यावीत. हानी टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मुबलक औषधांचा साठा असल्याची खातरजमा करावी. सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना  मुख्यालयी राहण्याबाबत सुचना द्याव्या. आरोग्य पथके तयार करावी. साथ रोग नियंत्रणाचा कृती आराखडा तयार करावा.  दुषित पाणी, अस्वच्छता, यामुळे पसरणाऱ्या रोगराईबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्व संबंधित व्यक्तिंची संपर्क यादी अद्यावत करावी.

सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्तीपुर्व दक्षता म्हणून रस्ते दुरुस्ती करावी. आपत्तीच्या वेळी सुरक्षित स्थलांतराचे मार्ग निश्चित करुन अन्य अधिकाऱ्यांना अवगत करावे. नादुरुस्त पूल; रस्ते व नुकसान झालेल्या सुविधांची दुरुस्ती करणे. पुरस्थितीत नागरिकांना सुरक्षित निवारा देण्यासाठी सार्वजनिक इमारतींची उपलब्धता करणे.

महावितरण कंपनीने त्यांचा नियंत्रण कक्ष २४X७ सुरु ठेवावा. रोहित्राचे नुकसान होणे, खांब कोसळणे, विजेच्या तार पाण्यात येणे यासारख्या आपत्ती तसेच विद्युत पुरवठा खंडित होणे यावरील उपाययोजनांबाबत आवश्यक नियोजन करणे. संपर्कासाठी तालुका ते गाव निहाय संपर्क यादी तयार करणे.

महानगरपालिका व अन्य नगरपालिकांनी २४X७ नियंत्रण कक्ष सुरु करावा. २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. मनपा हद्दीतील नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण करावी. पुरस्थितीतील शोध व बचाव साहित्य तपासून अद्यावत करुन ठेवावे. मान्सून कालावधीत आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करावे.

राज्य परिवहन महामंडळात  देखील पुरस्थितीत चालक वाहक यांनी आवश्यक दक्षता घ्यावी. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असतांना रस्ता ओलांडू नये. पुरात बसेस वाहून गेल्याच्या दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी.

जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने  नियंत्रण कक्षातून सर्व विभागांशी समन्वय राखावा. शोध व बचाव साहित्याची तपासणी करुन दुरुस्ती व पडताळणी करुन त्यांची सज्जता ठेवावी. अहोरात्र कक्ष सुरु ठेवून गाव पातळी ते राज्यस्तरावरील कक्षांशी समन्वय, संदेश देवाण घेवाण करावी.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ