विशेष लेखः- गुणकारी दशपर्णी अर्क


खरीप हंगाम तोंडावर आला असून या हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि भाजीपाला या पिकांवरील मित्रकिडींचे संरक्षण आणि शत्रू किडींचे निर्मूलन करण्यासाठी दशपर्णी अर्क गुणकारी आहे. दशपर्णी अर्क हे उत्‍तम प्रतीचे किडनाशक, बुरशीनाशक व टॉनिक म्हणूनही वापरता येते. दशपर्णी अर्क तयार होण्‍याकरीता ३० दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे खरीप हंगामासाठी दशपर्णी अर्क तयार करण्‍याची हीच योग्‍य वेळ आहे.

दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत

दशपर्णी अर्क तयार करण्‍याकरीता १० प्रकारच्‍या वेगवेगळया उग्र वासाच्‍या वनस्‍पतीच्‍या पाल्‍याचा उपयोग करण्यात येतो.

 पाणी २०० लिटर, शेण २ किलो, गोमुत्र १० लिटर, हळद पावडर २०० ग्रॅम, अद्रक पेस्‍ट ५०० ग्रॅम, तंबाखु १ किलो, हिरवी तिखट मिर्ची १ किलो, लसुन १ किलो, करंज पाला २ किलो (लहान फांद्यांसह), सिताफळ पाला २ किलो, एरंडी पाला २ किलो, पपई पाला २ किलो, कडुलिंब पाला ५ किलो, निरगुडीचा पाला २ किलो, रुईचा पाला २ किलो, धोतऱ्याचा पाला २ किलो, गुळवेल पाला २ किलो, बेलाचा पाला २ किलो, झेंडुचा पाला २ किलो, तुळ‍शी पाला २ किलो, कन्‍हेरी पाला २ किलो, कारल्‍याचा पाला २ किलो, शेवगा पाला २ किलो, आघाड्याचा पाला २ किलो, चिंचेचा पाला २ किलो या प्रमाणात घ्यावे.

या वनस्पतींचा पाला समप्रमाणात घेऊन पाला कुटुन देशी गायीचे ताजे शेण २ किलो व गोमुत्र १० लिटर व २० ते २५ लिटर पाणी २०० लिटरच्‍या टाकीमध्‍ये द्रावण तयार करुन कापडाच्‍या सहाय्याने झाकुन ठेवावे. मिश्रण दिवसातुन कमीत कमी २ वेळा ढवळावे व ढवळुन झाल्‍यानंतर झाकण पुन्‍हा व्‍यवस्थित बंद करावे. ढवळण्‍याची क्रिया ३० दिवस सुरु ठेवावी. या कालावधीत मिश्रण व्‍यवस्थित तयार होईल. तयार झालेले मिश्रण पातळ कापडाच्या सहाय्याने गाळुन घ्‍यावे.

दशपर्णी अर्काचा वापर

 बंद झाकणाच्या कॅन मध्ये व्यवस्थित साठवून ठेवल्यास दशपर्णी अर्क तीन महीन्यापर्यंत वापरता येतो. दशपर्णी अर्कात वेखंड पावडरचाही वापर करता येऊ शकतो. १५ लिटर पाण्‍यात २ ते २.५ लिटर दशपर्णी अर्क मिसळुन फवारणी करावी. दोन फवारणीतील अंतर ३ ते ४ दिवसापेक्षा जास्‍त असु नये. फवारणी सकाळी किंवा संध्‍याकाळी करावी.

            दशपर्णी अर्क तयार करण्‍याकरीता लागणारे साहीत्‍य हे सहज उपलब्‍ध होत असल्‍याने कमी मेहनतीमध्‍ये घरच्‍या घरी उत्‍तम प्रकारे किटकनाशक व पिकांसाठी टॉनिक तयार करु शकतो. तरी सर्व शेतकरी बांधवांनी दशपर्णी अर्क तयार करुन त्‍याचा वापर करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

*******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ