ग्रंथोत्सव २०२२- मस्तक घडवायचं तर पुस्तकच आवश्यक; ‘संगणकीय युगात ग्रंथांचे स्थान’ या परिसंवादात वक्त्यांचे मौलिक विचार


अकोला,दि.१० (जिमाका)-  संगणकाकडे केवळ एक माध्यम वा तंत्र म्हणून बघायला हवे.  ग्रंथ व्यवहारात संगणकाची मदत होत असतेही मात्र जर मस्तक घडवायचे असेल तर पुस्तकच आवश्यक आहे, अशा शब्दात प्रतिमा इंगोले यांनी आपले विचार व्यक्त केले. संगणकीय युगात ग्रंथांचे स्थान या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.

         ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सत्रानंतर दुसऱ्या सत्रात ‘संगणकीय युगात ग्रंथाचे स्थान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले.  या परिसंवादात ल.रा.तो.वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. स्वाती दामोदरे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा थोरात आणि विदर्भ साहित्य संघाच्या (अकोला) कार्याध्यक्ष सीमा रोठे यांनी सहभाग घेतला.

डॉ. श्रद्धा थोरात म्हणाल्या की, संगणक क्रांती आपण कोणीही थांबवू शकत नाही.  माध्यम काहीही असले तरी त्यातून प्रसारित होणारे विचार महत्त्वाचे असतात.  त्यामुळे आपण विचारांकडे वळावे व नव्या रुपातील ग्रंथांचे स्वागत करावे.डॉ. स्वाती दामोदरे म्हणाल्या की, संवाद हा ग्रंथांचा प्राण आहे.  ग्रंथ हा कोणत्या स्वरुपात आहे हे महत्त्वाचं नसून त्यातील विचार महत्त्वाचा आहे. शेवटी नवमाध्यमात दर्जाचा धोकाही आहे. ग्रंथ वाचनाला चालना देण्यासाठी आपण सण, उत्सव, वाढदिवस वगैरे औचित्य साधून पुस्तके भेट दिली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. सीमा रोठे म्हणाल्या की, ग्रंथ व्यवहारात लेखक ते वाचक या दरम्यान असणाऱ्या घटकांवर परिणाम होतो.  चांगले ग्रंथ निर्माण होत आहेत. संगणक आणि इंटरनेटमुळे   निर्माण झालेल्या नव्या माध्यमांची आपली अशी एक शक्ती आहे. या बदलत्या तंत्राचा स्विकार कसा करायचा ही आपली जबाबदारी आहे. चंद्रकांत चांगदे  यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ