सुशासन सप्ताहानिमित्त कार्यशाळा; विविध सेवा डिजीटल माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी मोहिम राबवा-निवासी उपजिल्हाधिकारी







 

            अकोला दि.23(जिमाका)- शासकीय कामाकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता निर्माण करण्यासाठी शासकीय कामकाज व विविध सेवा डिजीटल करणे आवश्यक आहे. यामुळे शासनाच्या विविध सेवा व योजना अधिक वेगाने नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. याकरीता सर्व विभागाने विशेष मोहिम राबवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सुशासन सप्ताह कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाडवे, सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे राजस्व अधिकारी स्नेहा सराफ, जिल्हा परिषदचे मुख्य लेखा अधिकारी विद्या पवार, कार्यकारी अधिक्षक श्री. कछोट, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, तसेच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

            निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण होण्याच्या दृष्टीने आणि शासकीय कामाकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय अभिलेख ऑनलाईन करणे आवश्यक आहे. खाजगी आस्थापना ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन नागरिकांना उत्तम सेवा देत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय मागे राहून चालणार नाही. याकरीता प्रशासनात माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करुन शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.

सुशासन सप्ताह कार्यशाळेत विविध विभागाचे सादरीकरण

            सुशासन सप्ताहानिमित्त गेल्या पाच वर्षात विविध विभागाव्दारे राबविलेल्या नाविण्यपूर्ण अभियानाचे पीपीटीव्दारे सादरीकरण केले. यामध्ये महसूल विभागाव्दारे सुरु केलेल्या डिजीटल राहूटी व ई-कोतवाल ऑनलाईन सुविधेची माहिती दिली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाव्दारे जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेत राबवित असलेल्या जॉली फोनिक इंग्लिश डेव्हलोपमेंट कार्यक्रमाविषयी चित्रफित दाखवून माहिती दिली. जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता अर्थ विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन सुविधेविषयी तर आरोग्य विभागाव्दारे राबवित असलेल्या कार्यक्रमाची माहिती पीपीटी सादरीकरणाव्दारे दिली. त्यानंतर पोलिस विभाग, महावितरण व जलसंपदा विभागाव्दारे राबविलेले उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिचोंले यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन महल्ले यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ