ग्रंथोत्सव २०२२; परिसंवादःग्रंथाने मला काय दिले? सर्वोत्कृष्ट ग्रंथ ‘संविधान’, त्यामुळेच मिळाला स्वाभिमान- संजय खडसे

 






अकोला,दि.११ (जिमाका)-  आयुष्यामध्ये संघर्षातून वाटचाल करतांना पुस्तकेच मदतीस येतात. तेच वाट दाखवतात. ग्रंथांच्या वाचनातून जीवन जगण्याचे मुल्य कळते. सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे या देशाचे संविधान असून या ग्रंथामुळे आज आम्हाला स्वाभिमान मिळाला, अशा शब्दात निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आपल्या ग्रंथाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘ग्रंथाने मला काय दिले?’ याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे हे होते. या परिसंवादात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र हे सहभागी झाले.

येथील  श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात हा परिसंवाद पार पडला. या परिसंवादात विचार मांडतांना डॉ. गजानन कोटेवार यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखविला. जिवनाच्या प्रत्येक टप्प्यात  ग्रंथांनी कशी मोलाची साथ दिली हे सांगितले. ते म्हणाले की, ग्रंथ आपल्याला व्यक्तिमत्व देतात.  आयुष्यात कराव्या लागलेल्या संघर्षाच्या काळात ग्रंथांमुळेच मदत झाली.  ग्रंथालये, अभ्यासिकांमुळे आज अनेक युवक अधिकारी झालेत.  मी आज जो काही आहे तो ग्रंथांमुळेच आहे, असे त्यांनी सांगितले.

एस. आर. बाहेती यांनी सांगितले की, वडिलांमुळेच पुस्तकांशी जवळीक झाली.  वाचन वयाप्रमाणे वाढत गेलं. वाचनामुळे वक्तृत्वस्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावता आली. वृत्तपत्रात काम मिळाले त्यामुळे आणखीनच वाचनाशी जवळीक निर्माण झाली.  ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळाल्याने आणखीनच ग्रंथाचा सहवास लाभला.  यामुळे व्यासंग वाढला.  त्यामुळे विविध क्षेत्रातील माणसे जोडता आली.  आजही मी पुस्तकातच रमतो, असे त्यांनी सांगितले.

अनुराग मिश्र यांनी सांगितले की,  प्रत्येक काळात महापुरुषांनी दिलेले विचार हे ग्रंथांमुळेच पुढच्या पिढीपर्यंत  पोहोचले.  आता इलेक्ट्रॉनिक गॅझेटस द्वारेही वाचन सुरु आहे.  मात्र पुस्तकांचे महत्त्व अबाधित आहे. माझ्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धनंजय कीर यांनी लिहिलेले जीवनचरित्र वाचनात आले. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी वाचून , तसेच संत तुलसीदास यांचे चरित्र, महात्मा गांधीचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकांनी माझ्यावर प्रभाव टाकला. पुढे ग्रंथचळवळीत काम करतांना ग्रंथांशी आणखीनच जवळीक निर्माण झाली.  सध्याच्या वातावरणात चांगले ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचविणे ही ग्रंथचळवळीतील लोकांची जबाबदारी होय. ग्रंथांची सोबत करुन आपण स्वतःची उन्नती करु शकतो, असे त्यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय खडसे यांनी सांगितले की, कर्तृत्व घडविण्यासाठी ग्रंथ आवश्यक आहेत.  भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ, ‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचे पुस्तक मला फार भावले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगिता ही आजही प्रशासनात काम करतांना दिशादर्शक ठरते.  अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या, विविध प्रकारची आत्मचरित्रे वाचून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. खरेतर घरोघरी ग्रंथांचे वाचन होत रहावे.  जीवन जगण्याचे सुख वाचनात आहे.  प्रशासनात काम करतांना विविध पुस्तकांच्या वाचनाचा खूप उपयोग होतो.  देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते संविधान हा एक उत्कृष्ट ग्रंथ असून संविधानामुळे मला स्वाभिमान मिळाला,असेही त्यांनी सांगितले.

या परिसंवादास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.प्रतिभा कोकाटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मनोज वानखडे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवादाचे सुत्रसंचालन राम मुळे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ