ग्रंथोत्सवास उत्साहात प्रारंभ वाचक व्हा आणि समृद्ध व्हा- गजलनवाज भिमराव पांचाळे















अकोला,दि.१० (जिमाका)-  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास वाजत गाजत काढण्यात आलेली ग्रंथदिंडी व उपस्थित वाचनप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला. ‘वाचक व्हा आणि समृद्ध व्हा’, अशा शब्दात गजलनवाज भिमराव पांचाळे यांनी उद्घाटनप्रसंगी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.

येथील  श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी  जिल्हा ग्रंथालय कार्यालय ते श्री शिवाजी महाविद्यालयापर्यंत शानदार ग्रंथदिंडी काढून या महोत्सवास सुरुवात झाली.पारंपारिक वेशभुषेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींची लेझीम पथके, पारंपारिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या या ग्रंथदिंडीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. ही दिंडी श्री शिवाजी महाविद्यालयात आल्यावर महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथोत्सवास विधीवत उद्घाटन करुन प्रारंभ झाला.

द्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर हे उपस्थित होते. या सोहळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, गजलनवाज भिमराव पांचाळे, ज्येष्ठ साहित्यीक प्रतिमाताई इंगोले, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. मधू जाधव, प्राचार्य डॉ. प्रतिभा कोकाटे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, डॉ. संजय तिडके, ग्रंथमित्र एस. आर.बाहेती, रामभाऊ देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करुन ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रंथोत्सव स्थळी उभारण्यात आलेल्या ग्रंथदालनाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पांचाळेंनी सांगितले गजल ओळींतून ग्रंथमहात्म्य

वाचलेली , ऐकलेली माणसे गेली कुठे?

पुस्तकातून पाहिलेली, भेटलेली माणसे गेली कुठे?

रोज अत्याचार होतो आरशावर आता

आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?

या ओळी गाऊन भिमराव पांचाळे यांनी सभागृहाची दाद मिळविली. आणि वाचक व्हा समृद्ध व्हा अशा शब्दात त्यांनी ग्रंथोत्सवाच्या शुभेच्छा उपस्थित नागरिकांना दिल्या.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी,परिसंवाद,व्याखान, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची  साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली आहे.

पल्या भाषणात संगिताताई अढाऊ यांनी ग्रंथांचे महत्त्व सांगितले. समाजात वाचनसंस्कृतीची जोपासना होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथोत्सवासारखे कार्यक्रम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

संजय खडसे म्हणाले की, माणसे घडविण्यासाठी ग्रंथांशिवाय पर्याय नाही. ग्रंथ हे खऱ्या अर्थाने माणसाचे गुरु आहेत.ग्रंथवाचनातून जीवनमूल्य कळतात. माणसाला जगतांना विचारांची गरज असते, ते विचार पुस्तके देतात. ग्रामिण भागातही सुजाण नागरिक घडविण्यासाठी ग्रंथालयांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी ग्रंथालय चळवळ आणि वाचन चळवळीला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. कोकाटे, मधु जाधव, प्रतिमा इंगोले, रामभाऊ देशपांडे यांनीही ग्रंथोत्सवास आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.  अध्यक्षीय समारोपात ॲड.गजानन पुंडकर यांनी ग्रंथोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

रविवारी होणारे कार्यक्रमः- रविवार दि. ११ रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ वा. ‘ग्रंथाने मला काय दिले’ विषयावर परिसंवाद. अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, सहभागः महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र. सुत्रसंचालन-राम मुळे.दुपारी दोन वा. ‘अडम धडम’ हे कविसंमेलन. अध्यक्ष- राजाभाऊ देशमुख, सहभाग- धीरज चावरे, प्रशांत वरईकर, हिम्मत ढाळे, देवलाल तायडे. त्यानंतर ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री प्रयोग, सादरकर्त्या- हर्षदा इंदाने. सायं. ४ वा.समारोप सत्र.अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार. उपस्थितीः सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, तहसिलदार सुनिल पाटील, अशोक चंदन, डॉ. हेमंत सपकाळ.

या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ